आपण कधीही ड्रग्सचा व्यवसाय केला नाही आणि माझ्याकडे फक्त हर्बल तंबाखू सापडली होती, असं नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांच्यासह ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ब्रिटीश नागरिक करण सजनानी यांनी सांगितले. करण सजनानीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बुधवारी मुंबईत बोलावले होते. सजनानी, त्याचा साथीदार राहिल फर्निचरवाला आणि समीर खान यांना एनसीबीने २०० किलो ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी या वर्षी जानेवारीमध्ये अटक केली होती. मुंबईच्या एनसीबी युनिटमधून एसआयटीकडे हस्तांतरित केलेल्या सहा प्रकरणांपैकी हे एक प्रकरण आहे.

इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना करण सजनानी म्हणाला, “एनसीबीने मला का बोलावले ते मला माहीत नाही. मी सध्या जामिनावर बाहेर आहे आणि न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व अटींचे पालन करत आहे. जामीन आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की आमच्याकडे सापडलेल्या नमुन्यांमध्ये अंमली पदार्थ नव्हते. मी नेहमीच सांगत आलोय की ती हर्बल तंबाखू आहे जी ऑनलाइन वेबसाइटवर देखील विकली जाते.” जप्त केलेल्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या १ किलो गांजाबद्दल तो म्हणाला, “ज्या नमुन्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तो वनस्पतिजन्य आहेत आणि त्यात कोणतेही अंमली पदार्थ नाहीत”.

समीर खान त्याच्या कथित ड्रग्सच्या व्यवसायात कथितपणे आर्थिक मदत करत असल्याच्या आरोपावर करण सजनानी सांगितलं की, “समीर हा माझा मित्र आहे. आमच्या आई एकमेकींच्या मैत्रीणी आहेत. तो करोडो रुपयांच्या कथित ड्रग्सच्या मालमत्तेचा भागीदार का असेल आणि फक्त २० हजार रुपये का देईल?. तसेच आम्ही ड्रग्सचा कोणताही व्यवसाय करत नाही आणि कोणत्याही ऑपरेशनला पैसे पुरवत नाही. कानपूरमध्ये माझे जे गोदाम होते त्यात काहीही सापडले नाही,” असेही करण सजनानीने सांगितले.

दरम्यान, “आपण त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही पत्र लिहून मदत मागितली आहे, असे करण सजनानी म्हणाले. “मी ब्रिटनच्या गृह सचिव प्रिती पटेल यांच्या संपर्कात आहे. त्यांनी मला यूके उच्चायुक्तांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे आणि प्रकरणांबाबत मदत करण्यास ते इच्छुक आहेत,” असंही सजनानीने सांगितलं.