मंत्रिपदे आणि खात्यांसंदर्भातील मागणीला भाजपने अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे. त्यातच, विधानसभेतील तिसरा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विरोधी पक्षनेतेपदासाठी आपला दावा केला. ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था होऊ नये, यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा अर्ज दाखल केल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र, ‘जुळले तर जुळले’ असे सांगत भाजपशी सत्तासहभागाची बोलणी सुरू ठेवण्याचेही संकेत त्यांनी दिले.
‘राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यास आम्ही विरोधी बाकांवर बसू,’ या उद्धव यांच्या इशाऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे सोमवारपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिवसेना विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळाला. तरीही भाजपकडून काही प्रस्ताव येतो का, अशी वाटही पाहिली जात होती. याच दरम्यान, काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्या पक्षाचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज दाखल केला. एकीकडे, भाजपकडून प्रस्ताव नाही आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदही हातून जाण्याची भीती यामुळे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचे पत्र सोमवारी सायंकाळी विधिमंडळ सचिव डॉ. अनंत कळसे यांना दिले. विरोधी पक्षनेतेपदाचा दावा दाखल करण्यासाठी मुदत नसली तरी अध्यक्ष निवडीपर्यंत अर्ज दाखल केले की अध्यक्षांची निवड झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित असते. शिवसेनेचे ६३ व काँग्रेसचे ४२ सदस्य निवडून आले असून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना आहे. त्यामुळे साहजिकच शिवसेनेचाच विरोधी पक्षासाठी हक्क आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठीही शिवसेना उमेदवार उभा करणार असल्याचे शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. गुलाबराव पाटील किंवा विजय आवटी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला असला तरी भाजपशी चर्चा सुरूच राहील, असे उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले. ‘भाजप केवळ चर्चाच करीत आहे आणि काँग्रेसने विरोक्षी पक्षनेतेपदावर दावा सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेनेला धड सत्तेत सहभाग नाही आणि विरोधी पक्षनेतेपदही नाही, अशी अवस्था होऊ नये, यासाठी विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या मुद्दय़ावर भाजपने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करूनही सोमवारी भाजपने काहीही केले नाही. त्यामुळे विरोधी पक्षात बसण्याचे ठरविल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार फोडाफोडीचे ‘ऑपरेशन लोटस’
 राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वबळावरच १४४चा जादुई आकडा कसा गाठता येईल या दृष्टीने भाजपच्या धुरिणांनी चाचपणी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून कर्नाटकच्या धर्तीवर राजीनामा घेऊन पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांना गळाला लावण्याची भाजपची व्यूहरचना असल्याचे उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले.
कर्नाटकमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बहुमताचा पल्ला गाठण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना राजीनामे देण्यास भाग पाडून त्यांना भाजपच्या वतीने निवडून आणण्याचे ‘ऑपरेशन लोटस’ हे अभियान राबविले होते. या योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चाही केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही चेहऱ्यांचा सध्या शोध घेण्यात येत आहे. या आमदारांनी राजीनामे द्यायचे, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा आणि पोटनिवडणुकीत भाजपच्या वतीने निवडून आणण्याचे धोरण आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader or go with bjp shiv sena keeps both options open
First published on: 11-11-2014 at 02:49 IST