मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाला (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) जोडणाऱ्या शिवडी ते वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाला या प्रकल्पात बाधित होणाऱ्या रहिवाशांनी विरोध केला आहे. रहिवाशांना पुनर्वसनाचा कोणताही आराखडा सादर केलेला नाही, तसेच कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध करीत आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या रविवारी, २४ एप्रिलला प्रभादेवी येथे मोर्चा काढण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) शिवडी ते वरळी उन्नत रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. मुंबई पारबंदर प्रकल्प सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण करायचा आहे. या अनुषंगाने एमएमआरडीएने या प्रकल्पातील आंतरबदल मार्गिका आणि उन्नत रस्त्याच्या कामालाही गती दिली आहे. त्यामुळेच शिवडी ते वरळी उन्नत रस्त्यात अडसर बनलेल्या बांधकामे निष्कासित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एमएमआरडीएने वरळी, प्रभादेवी, शिवडी येथील १०००हून अधिक बाधित कुटुंबांना नोटीस बजाविली आहे. या नोटिशीनुसार निष्कासनाच्या अनुषंगाने पात्रता निश्चितीसाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच वेळी पालिकेकडून निष्कासनासाठी दडपशाहीचा वापर केला जात असल्याचा आरोप बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेने केला आहे. बाधित रहिवाशांना विश्वासात घेतले जात नसून पुनर्वसनाबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप परिषदेने केला आहे.
या पार्श्वभूमीवर परिषद आणि रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. हा विरोध सरकापर्यंत पोहोचविण्यासाठी परिषद आणि रहिवाशांनी २४ एप्रिलला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भाऊसाहेब तोडणकर मार्ग, प्रभादेवी येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे सचिव प्रकाश रेड्डी यांनी दिली. या मोर्चात म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशीही सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition shivdi worli elevated road residents march next sunday believing mumbai port amy
First published on: 21-04-2022 at 00:03 IST