राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांची अटक टाळण्यासाठी पोलीस चकमकीत ठार झालेल्या एका गुंडाच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागल्याच्या प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. सरकार इतके हतबल झाले आहे का, अशी टीका विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. त्यावर मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार ही भरपाई द्यावी लागली, अशी कबुली गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पोलीस चकमकीत ठार झालेला गुंड रमेश ऊर्फ रम्या पवार याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देण्याचे आदेश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दिले होते. तसेच दिलेल्या मुदतीत ही रक्कम न दिल्यास मुख्य सचिवांच्या अटकेचे वॉरंटही काढले होते. त्यामुळे राज्य सरकारला मुख्य सचिवांची अटक टाळण्यासाठी गुंडाच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये द्यावे लागले.
यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. विधान परिषदेत शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात राज्य सरकारने निवेदन करावे, अशी मागणी केली. गृह विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी विनोद तावडे यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. पोलीस चकमकीत ठार झालेल्या गुंडाच्या कुटुंबीयांना भरपाई देऊन मुख्य सचिवांची अटक टाळावी लागते ही सरकारसाठी नामुष्कीची बाब आहे, अशी टीका त्यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार सरकारला ही भरपाई द्यावी लागली, अशी कबुली सतेज पाटील यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jul 2013 रोजी प्रकाशित
गुंडाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये ; सरकारच्या हतबलतेवर विरोधकांचा हल्ला
राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांची अटक टाळण्यासाठी पोलीस चकमकीत ठार झालेल्या एका गुंडाच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागल्याच्या प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले.

First published on: 23-07-2013 at 04:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition uproar in maharashtra assembly over jayant kumar banthia payment