आझाद मैदान हिंसाचारावरील कविता केल्याचे प्रकरण
आझाद मैदान हिंसाचारावर भाष्य करणारी वादग्रस्त कविता लिहिणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त सत्यपालसिंह यांनी मंगळवारी दिले. सुजाता पाटील असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून उपायुक्त एस. एस. घोलप यांच्यामार्फत ही चौकशी होणार आहे. पाटील दोषी आढळल्यास त्यांच्यावर धार्मिक भावना भडकविल्याबद्दलच्या गुन्ह्य़ांतर्गत कारवाई होऊ शकते.
माटुंगा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पाटील यांनी ‘संवाद’ या पोलिसांच्या मासिकात नुकतीच एक कविता लिहिली होती. आझाद मैदानातील दंगलखोरांवर या कवितेतून आक्षेपार्ह शब्दांतून पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला होता. या कवितेमुळे धार्मिक भावना भडकल्याचा आरोप होत आहे.  ‘मुस्लिम ए हिंदू’ या संस्थेच्या अमीन मुस्तफा इद्रिसी आणि या िहसाचारातील एक आरोपी नझर मोहम्मद सिद्दिकी यांनी या प्रकरणी आझाद मैदान पोलीस आणि थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. त्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्त घोलप प्रकरणाचा चौकशी अहवाल पंधरवडय़ात अहवाल सादर करतील.
दरम्यान, पाटील यांनी यापूर्वीच या कवितेबद्दल माफी मागितली असून कवितेच्या माध्यमातून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले होते. सहपोलीस आयुक्त (प्रशासन) हेमंत नगराळे यांनीही पाटील यांचा माफीनामा असलेला खुलासा मासिकाच्या पुढच्या अंकात प्रसिद्ध होणार असल्याचे सांगितले आहे.