मुंबई : केईएम रुग्णालयात नुकत्याच सुरू केलेल्या अवयवदानाच्या शस्त्रक्रियागृहामध्ये ५० शल्यचिकित्सकांना अवयवदानाचे प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात प्रथमच अशी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे.
प्रादेशिक आणि विभागीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण समितीच्या (रोटो-सोटो) माध्यमातून रविवार आणि सोमवारी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. हृदय, यकृत, मूत्रिपड, लहान आतडे, स्वादुपिंड आणि हाडे शास्त्रीय पद्धतीने शरीरापासून विलग कसे करावेत याचे प्रशिक्षण शल्यचिकित्सकांना देण्यात आले.
डॉ, रवी मोहंका आणि डॉ. रामकृष्ण प्रभू यांनी यकृत दानाचे, तर डॉ. सुजाता पटवर्धन, डॉ. जयेश ढबालिया आणि डॉ. प्रकाश पवार यांनी मूत्रिपड दानाबाबत डॉक्टरांना मार्गदर्शन केले. हृदयदानाबाबतची प्रात्यक्षिके डॉ. बालाजी ऐरोनी आणि हाडे दानाबाबत डॉ. अभिजीत काळे यांनी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले.
केईएममध्ये उणे १४ अंश सेल्सिअस तापमानाखाली शव जतन करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे प्रत्यक्ष शवाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देणे शक्य झाले. अशा रीतीने डॉक्टरांना प्रत्यक्ष अनुभव घेऊन अवयदानाबाबतचे प्रशिक्षण राज्यात प्रथमच आयोजित केले आहे. डॉक्टर अधिकाधिक प्रशिक्षित झाल्यास अवयवदानाची मोहीम निश्चितच वाढेल, असे मत रोटो-सोटोने व्यक्त केले आहे.