रस्त्यावरील अपघातापासून बाळंतपणासाठी येणाऱ्या हजारो रुग्णांसाठी जीवनदायी असलेल्या महापालिकेच्या शीव रुग्णालयात पुरेसे डॉक्टर-अध्यापक, तंत्रज्ञ तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्ती करताना मात्र पालिका प्रशासनाकडून कायमच सापत्न भावाची वागणूक देण्यात येते. पालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि शीव रुग्णालयात उपचार केले जाणारे रुग्ण यांचा संख्यात्मक विचार केला तर ही उपेक्षा पुरती स्पष्ट होत असून याचा फटका कधी डॉक्टरांना तर बहुतेक वेळा रुग्णांना बसत असतो.
पालिकेच्या शीव रुग्णालयात सुमारे १७५० खाटा असून सुमारे १९ लाख रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात उपचार घेतात, तर केईममध्ये २०५० आणि नायरमध्ये १४०० खाटा असून तेथे उपचार घेणाऱ्यांची संख्या १८ लाख व नऊ लाख एवढी आहे. प्रामुख्याने रस्त्यावर तसेच रेल्वे अपघातांतील बहुसंख्य रुग्णांना शीव रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत असून ही संख्या प्रचंड म्हणावी लागेल. शीव रुग्णालयात अपघातांत जखमी झालेल्या एक लाख ८१ हजार रुग्णांवर उपचार केले जातात, तर केईएममध्ये हीच संख्या चाळीस हजार एवढी असल्याचे शीव रुग्णालयातील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. केईएम व शीव रुग्णालयातील आंतररुग्णांच्या संख्येत फारसा फरक नसून सुमारे ८३ हजार रुग्ण येथे वर्षांकाठी दाखल होत असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरीब वस्तीमधील बहुतेक बाळंतपणे ही गेली अनेक वर्षे शीव रुग्णालयात होत असून वर्षांकाठी १४ हजार बालकांचा येथे जन्म होतो, तर केईएममध्ये हीच संख्या आठ हजार एवढी आहे. या पाश्र्वभूमीवर शीव रुग्णालयाला पालिकेकडून मिळणारी आर्थिक मदत तसेच कर्मचाऱ्यांची संख्या यात मात्र मोठी तफावत आहे. शीव रुग्णालयाची इमारतही आता जुनी झाली असून नव्याने विस्तारित इमारत उभी करण्याची योजना पालिका प्रशासनाने हाती घेतली असली तरी येणाऱ्या रुग्णांच्या लोढय़ांच्या तुलनेत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व साहाय्यक प्राध्यापकांची संख्या मात्र खूपच कमी म्हणावी लागेल. याही परिस्थितीत शीव रुग्णालयातील हृदयविकार विभाग, बालरोग उपचार विभाग, शल्यचिकित्सा विभागासह सर्वच विभाग सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवत आहेत. आपत्कालीन उपचार विभागाला विश्रांती हा शब्दच माहीत नाही, अशी येथील परिस्थिती असली तरी कर्मचारी वर्गाची संख्या अत्यंत अपुरी असल्याचा फटका अनेकदा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना बसतो. यातूनच मग आपल्या रुग्णाकडे डॉक्टर व कर्मचारी लक्ष देत नसल्याची भावना निर्माण होऊन डॉक्टरांवर हल्ले होत असतात. आकडेवारीच्या भाषेत स्पष्ट करायचे झाल्यास शीव रुग्णालयात ५० प्राध्यापक, ८८ सहयोगी प्राध्यापक व १७५ साहाय्यक प्राध्यापक आहेत, तर १७२५ चतुर्थश्रेणी कर्मचारी, ७७८ परिचारिका तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा ५३० कर्मचारी व अधिकारी वर्ग आहे. त्या तुलनेत केईएममध्ये ९५ प्राध्यापक, १४३ सहयोगी प्राध्यापक व २६० साहाय्यक प्राध्यापकांची पदे आहेत, तर १८३३ चतुर्थश्रेणी कर्मचारी व ९६५ परिचारिका आहेत. याशिवाय महाविद्यालयाचा कारभार सांभाळण्यासाठी ८०१ कर्मचारी-अधिकारी आहेत. तुलनेत कमी पसारा असलेल्या नायर रुग्णालयातही शीव रुग्णालयापेक्षा जास्त प्राध्यापक-अध्यापक आहेत. नायरमध्ये ५८ प्राध्यापक, ९८ सहयोगी प्राध्यापक व १६६ साहाय्यक प्राध्यापक अशी संख्या असून सर्वोत्तम उपचार देणाऱ्या शीव रुग्णालयाची उपेक्षा का, असा सवाल येथील ज्येष्ठ डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर काही डॉक्टर म्हणाले की, गेली पंचवीस वर्षे सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक उपचारांसाठी हक्काने आम्हाला दूरध्वनी करतात, मात्र आमच्यावर पडणाऱ्या ताणाविषयी हे तोंडही उघडत नाहीत.
दुप्पट डॉक्टर-कर्मचारी हवेत
खरे तर शीव, केईएम आणि नायर ही तिन्ही रुग्णालये ही मुंबईची आरोग्यवाहिनी असून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्याच्या किमान दुप्पट कर्मचारी व डॉक्टरांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीव रुग्णालय
* १७५० खाटा
* बाह्य़रुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण १९ लाख
* आंतररुग्ण वर्षांला ८३ हजार
* वर्षांकाठी १४ हजार बालकांचा जन्म कर्मचारी
* ५० प्राध्यापक, ८८ सहयोगी प्राध्यापक, १७५ साहाय्यक प्राध्यापक, १७२५ चतुर्थश्रेणी कर्मचारी, ७७८ परिचारिका

केईम रुग्णालय
* २०५० खाटा
* बाह्य़रुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण १८ लाख
* आंतररुग्ण वर्षांला ८३ हजार
* वर्षांकाठी आठ हजार बालकांचा जन्म कर्मचारी
* ९५ प्राध्यापक, १४३ सहयोगी प्राध्यापक, २६० साहाय्यक प्राध्यापक, १८३३ चतुर्थश्रेणी कर्मचारी व ९६५ परिचारिका

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oversight shiva hospital from municipal administration
First published on: 25-11-2015 at 02:06 IST