मुंबई : ‘ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला संपवायचा प्रयत्न केला त्यांनाच संपवून शिवसेना पुढे गेली’, असे सांगत केवळ पक्ष कार्यकर्ते नव्हे तर गुरू – शिष्याचे नाते जपत शिवसैनिक घडवणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले. ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची झलक एका भव्यदिव्य सोहळय़ात  आणि उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखवण्यात आली. या सोहळय़ाला हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित होते.

शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित चरित्रपट १३ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अभिनेता सलमान खान यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. यानिमित्ताने, उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

आनंद दिघे हे कट्टर शिवसैनिक होते. हिंमत असेल तर टक्कर दे, मी कोणालाही भीत नाही, इतक्या निडर वृत्तीने वावरणारे दिघेंसारखे लाखमोलाचे निष्ठावान शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना लाभले. त्यांच्यानंतर मलाही त्यांचे प्रेम मिळाले, याहून भाग्य काय असू शकते? असे सांगत बाळासाहेबांनी असे कट्टर निष्ठावान शिवसैनिक घडवले होते, दिघेंनीही पुढे शिवसैनिकांच्या मनात कोणापुढेही न झुकता पक्षकार्य करत राहण्याची कट्टर निष्ठा भरली, अशा शब्दांत ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या कार्याचे कौतुक केले. दिघेंचा हा जीवनपट शिवसैनिकाची निष्ठा काय असते हे दाखवून देणारा चित्रपट आहे, तो त्या भावनेतून पाहायला हवा, असे आवाहनही ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.