scorecardresearch

वातानुकूलित लोकलसाठी भाडेकपात होताच प्रवासी संख्येत वाढ

गेल्या नऊ दिवसांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलची ६५ हजार तिकिटांची विक्री झाली आहे.

वातानुकूलित लोकलमधून आता उभ्याने प्रवास

मुंबई : भाडेदरात कपात होताच मध्य तसेच पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढला आहे. आधी रिकाम्या धावत असलेल्या वातानुकूलित लोकल गाडय़ांच्या फेऱ्यांना भाडे कपातीनंतर गर्दी होत आहे. काही फेऱ्यांना होत असलेल्या गर्दीमुळे उभ्यानेही प्रवास करावा लागत आहे.

गेल्या नऊ दिवसांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलची ६५ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. भाडय़ात ५ मे पासून कपात होताच तिकीट विक्रीत वाढ झाली आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा लोकल फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५ मेपासून ५० टक्के कपात करण्यात आली. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. तिकीट दरात झालेली कपात आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे प्रवाशांनी वातानुकूलित लोकलला पसंती दिली. त्यामुळे मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांना गर्दी होत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा मार्गावर ४४ लोकल फेऱ्या होत असून यात सीएसएमटी ते कल्याण, बदलापूपर्यंत धावणाऱ्या काही फेऱ्यांना गर्दी होऊ लागली आहे. सकाळी तसेच सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर नोकरदार वर्गासह अन्य प्रवासी यातून प्रवास करीत आहेत.

दर कपातीनंतर मध्य रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडय़ांमधील तिकिटांची विक्री वाढली आहे. १ ते ९ मे या काळात ३२ हजार ९८४ तिकिटांची विक्री झाली असून ५ मेनंतर तिकिटांची अधिक विक्री झाली आहे. १ मे रोजी केवळ १३, २ मे रोजी २,९६३, ५ मे रोजी ४,७७६ आणि ९ मे रोजी ५,७०२ तिकिटांची विक्री झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. या विक्रीतून एक कोटी १६ लाख रुपये महसूल मिळाला. पश्चिम रेल्वेवरही गेल्या नऊ दिवसांत ३३ हजार २९ तिकिटांची विक्री झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १ मे रोजी १,६२६, तर ४ मे ३,०६० आणि ९ मे रोजी ५,६०० तिकिटांची खरेदी प्रवाशांनी केली आहे. यातूनही चांगला महसूल मिळाल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

विनातिकीट घुसखोरीची शक्यता

काही प्रवासी या लोकलमध्ये विनातिकीट घुसखोरी करत असल्याचा अंदाज उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी व्यक्त केला. वातानुकूलित लोकलमधील प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी तिकीट तपासनीसही नाहीत. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांची संख्या समजणेही अवघड आहे. ही तपासणी करणे गरजेचे असल्याचे अरडगे म्हणाल्या.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Passengers increase after fare for air conditioned locals reduced zws