ठाणे घोडबंदर रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे बांधण्यात आलेला पातलीपाडा उड्डाणपूल शनिवारी खुला होत आहे. पातलीपाडा उड्डाणपुलाची लांबी ३९५ मीटर असून या चौपदरी पुलाच्या बांधकामासाठी २१ कोटी रुपये खर्च आला आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते व विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा उड्डाणपूल खुला होईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून घोडबंदर रस्त्यावर मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ जंक्शन येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. पैकी वाघबीळ येथील उड्डाणपूल मार्च २०१२ मध्ये सुरू वाहतुकीसाठी खुला झाला. तर मानपाडा उड्डाणपूल जानेवारी २०१३ अखेपर्यंत पूर्ण होणार आहे. तर ठाणे शहरातील कापूरबावडी उड्डाणपूल डिसेंबर २०१३ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.