राष्ट्रवादी कॉंग्रेस तिसऱया आघाडीमध्ये जाणार नाही. केवळ कॉंग्रेससोबत वाटाघाटींमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचे सूत्र कायम ठेवण्यास दबाव निर्माण करण्यासाठी त्यांच्या पक्षातील नेते डाव्या पक्षांनी बोलावलेल्या परिषदेला गेले होते, असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
धर्मनिरपेक्षतेच्या नावावर समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बुधवारी नवी दिल्लीमध्ये एका परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे सदस्य डी. पी. त्रिपाठी उपस्थित होते. त्रिपाठी यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस तिसऱया आघाडीमध्ये जाणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली.
मुंडे म्हणाले, मला असे वाटते की शरद पवार तिसऱया आघाडीमध्ये जाणार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना गेल्या निवडणुकीतील जागांचे सूत्र कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेसवर दबाव निर्माण करण्यासाठीच त्यांच्या पक्षातील नेते कालच्या परिषदेला गेले असावेत. लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने हे राजकारण खेळले आहे.