अभिनेत्री पायल घोषने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अनुराग कश्यपने लैंगिक शोषण केल्याचा आरोप पायलने केला आहे. त्यानंतर आता तिने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पायलचे वकील नितीन सातपुते यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम ३७६,३५४,३४१ आणि ३४२ अंतर्गत अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असं ट्विट नितीन सातपुते यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुराग कश्यपवर काही आरोप केले होते. यात अनुराग कश्यपने तिच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचं तिने म्हटलं होतं. सोबतच तिने एका मुलाखतीचा व्हिडीओदेखील शेअर केला होता.

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं आहे. त्यानंतर आता तिने अनुराग विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

दरम्यान, पायलने केलेल्या आरोपांनंतर अनुराग कश्यपने सारे आरोप फेटाळून लावले होते. त्याने ट्विटरच्या माध्यमातून पायल खोट बोलत असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे सध्या या प्रकरणी अनेक जण व्यक्त होताना दिसत आहे. काहींनी सेलिब्रिटींनी अनुरागला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी मात्र त्याच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Payal ghosh files a complaint against anurag kashyap at versova police station in mumbai ssj
First published on: 23-09-2020 at 09:53 IST