मुंबई आणि अवघ्या देशासाठी २००८ नंतर दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस त्या दहशतवादी हल्ल्याच्या दुखऱ्या आठवणी जागवणारा आणि हल्लेखोर कसाबला अद्याप फाशी झाली नाही हा संताप जागवणारा असायचा. पण कसाबला नुकतीच फाशी दिली गेली आणि याच समाधानाच्या वातावरणात सोमवारी ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे कार्यक्रम होत आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर अजमल आमीर कसाब याला २१ नोव्हेंबरला पुण्यात फाशी देण्यात आली. या पाश्र्वभूमीवर यंदा २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याला चार वर्षे पूर्ण होत आहेत. सोमवारी त्या हल्ल्याच्या भीषण आठवणी आणि आपल्या जवळच्यांना गमावल्याची वेदना पुन्हा जागी होईल. पण या सर्वाना कारणीभूत असलेल्या कसाबला फासावर लटकवले गेले याचे मोठे मानसिक समाधान त्यांना असणार आहे. मृतांच्या, शहीदांच्या स्मृतींना वाहिलेली ती मोठी श्रद्धांजली ठरणार आहे.
मुंबईत २६ नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला रविवारी एक शांतता फेरी काढण्यात आली. दहशतवादाशी लढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्या हल्ल्यात आपला पती आणि मुलगी गमावलेल्या अमेरिकेच्या शेर डिलिसेक यांनीही त्यात सहभागी होत मुंबईकरांचे आभार मानले.
या शहरात पती व मुलीला गमावल्यानंतर मी कोसळले होते. पण मुंबईने आणि येथील लोकांनी मला मानसिक आधार दिला. आता हे शहर म्हणजे माझे कुटुंब झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुंबईवरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या, शहीद झालेल्यांना आपण दरवर्षी श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या स्मृती जागवतो. पण या हल्ल्यावेळी जखमींना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या हजारो अज्ञात मुंबईकरांचे आणि दहशतवाद्यांशी सामना केलेल्या पोलिसांचेही आपण स्मरण ठेवायला हवे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी, असे आवाहन मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2012 रोजी प्रकाशित
मुंबईत आज ठिकठिकाणी आठवणींना उजाळा
मुंबई आणि अवघ्या देशासाठी २००८ नंतर दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस त्या दहशतवादी हल्ल्याच्या दुखऱ्या आठवणी जागवणारा आणि हल्लेखोर कसाबला अद्याप फाशी झाली नाही हा संताप जागवणारा असायचा.
First published on: 26-11-2012 at 03:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peace march held in mumbai on eve of 2611 anniversary