मुंबई : दक्षिण मुंबईमधील पेडर रोड परिसरातील कॅडबरी हाऊसच्या जागी नवी इमारत उभी राहात असून मुसळधार पाऊस आणि सुरू असलेले बांधकाम यामुळे गुरुवारी रात्री लगतच्या टेकडीवरून दरड कोसळली. यामुळे कॅडबरी हाऊसलगतच्या पदपथाला तडे गेले. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत भूगर्भशास्त्र तज्ज्ञ आणि संरचनात्मक तपासणी करणाऱ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील काम करावे, अशी सूचना मुंबई महापालिकेने केली आहे.

पेडर रोड येथील कॅडबरी जंक्शन परिसरातील कॅडबरी हाऊसच्या जागेवर बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कॅडबरी हाऊसच्या पाठीमागे छोटी टेकडी आहे. मुंबईत गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळत होता. पाऊस आणि सुरू असलेले बांधकाम यामुळे या टेकडीवरून गुरुवारी रात्री दरड कोसळली. कोसळलेल्या दरडीमुळे पदपथाला तडे गेल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या इमारत आणि प्रस्ताव विभागाला कळविण्यात आले आहे. पदपथाच्या दुरुस्तीसाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असेही पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

या संदर्भात भूगर्भशास्त्र तज्ज्ञ आणि संरचनात्मक तपासणी करणाऱ्या तज्ज्ञांच्या सल्लाने पुढील बांधकाम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.