फॅशन बघायला जाणे म्हणजे त्या मॉडेलने घातलेले कपडे बघणे अभिप्रेत असते. मात्र, भारतीय पुरुषांची मानसिकता याबाबतीत फार चुकीची आहे. एखादी मुलगी मॉडेल आहे, ती कमी कपडे घालते म्हणजे ती चवचाल आहे, असा अर्थ पुरुषांकडून काढला जातो. असा अर्थ काढताना प्रत्येक स्त्री ही कु णाची तरी बहीण असते, आई असते हे का लक्षात घेतले जात नाही. तिच्याकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. स्त्री म्हणून तिचा मान जपलाच पाहिजे, असे परखड मत मॉडेल-अभिनेत्री अमृता पत्की हिने मंगळवारी झालेल्या ‘केसरी प्रस्तुत लोकसत्ताच्या व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमात मांडले.
कार्यक्रमाची क्षणचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मालाडची, मराठमोळ्या पत्की कुटुंबातील अमृताने ‘मिस इंडिया’, ‘मिस अर्थ’ सारखे किताब पटकावत आज फॅशन इंडस्ट्रीत यशस्वी मॉडेल म्हणून आपली मोहोर उमटवली आहे. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील साधी मुलगी ते यशस्वी मॉडेल हा प्रवास कसा झाला, फॅ शन म्हणजे नेमके काय, मराठी मुली या फॅ शन इंडस्ट्रीपासून दूर का राहतात इथपासून ते रॅम्पवॉक, फॅ शन डिझायनर्सचे ब्रँडेड कपडे, अशा मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित अनेक शंका-कुशंकांना अमृताने मंगळवारी सडेतोड उत्तरे दिली. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात फॅ शन आणि मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमवू पाहणाऱ्या तरुणाईच्या गर्दीत अमृताबरोबरच्या गप्पांचा हा कार्यक्रम चांगलाच रंगला.
(सविस्तर वृत्त.. ९ मे रोजीच्या व्हिवा पुरवणीत) झी-२४ तास या वृत्तवाहिनीवर शनिवार, ३ मे रोजी सायं. ५.३० वाजता हा कार्यक्रम पाहता येईल.