scorecardresearch

Sharad Pawar Viral Photo : ‘कधी पावसात, तर कधी रांगेत’, शरद पवार यांच्या विमानतळावरील फोटोची जोरदार चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विमानतळावरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विमानतळावरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत शरद पवार विमानात प्रवेश करण्याआधी सर्वसामान्य प्रवाशांच्या रांगेत उभे राहिलेले दिसत आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात केंद्रीय मंत्रिपदापासून अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) प्रमुख पदापर्यंत अनेक पदं भुषवली आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना अतिविशेष व्यक्तीचा (VIP) दर्जा आहे. असं असतानाही त्यांनी इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रांगेत उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणत सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

शरद पवार यांनी कॅन्सरसारख्या आजाराचा सामना केल्यानंतरही आपलं राजकीय कामातील सातत्य जराही कमी केलेलं नाही. अगदी वयाच्या या टप्प्यावरही वादळानंतरचा महाराष्ट्राचा दौरा असो की विरोधकांच्या समोर निवडणुकीच्या मैदानात भर पावसात दंड थोपटणं असो पवार पायाला भिंगरी लावून फिरताना दिसतात. त्यामुळेच त्यांच्यातील हा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल असा आहे. आता तर विमानतळावर व्हीआयपी दर्जा असतानाही शरद पवार सर्वसामान्यांप्रमाणे प्रवेशाच्या रांगेत उभे दिसल्याने त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

हेही वाचा : शरद पवारांना ‘आगलावे’ म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांना राष्ट्रवादीने दिलं उत्तर; म्हणाले “सूर्यावर थुंकण्याचा…”

शरद पवार यूके ९७० या विमानाने मुंबईहून दिल्लीला जात असतानाचा हा फोटो असल्याचं बोललं जात आहे. मुंबईहून विमानात बसताना शरद पवार यांनी आपल्या व्हीआयपी दर्जाचा उपयोग करून वेगळा प्रवेश न करता सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे रांगेत उभं राहून विमानात प्रवेश केला. त्यामुळेच महाविकासआघाडीचे समर्थक शरद पवार यांच्या या कृतीला त्यांचा हिमालयाच्या उंचीएवढा साधेपणा म्हणत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Photo of sharad pawar boarding on plane viral supporter praising for simplicity pbs

ताज्या बातम्या