छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात सुरू असलेला जागेचा शोध अखेर संपला असून नरिमन पॉईंट आणि राजभवन या दरम्यान हे स्मारक उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्मारकाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून तेथेच स्मारक उभारण्यास अनुकूलता दाखविली. मात्र हे स्मारक उभारणीसाठी विविध प्रकारच्या २५ परवानग्या मिळवाव्या लागणार असून त्याचाही शोध सुरू झाला आहे.
मुंबई किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि शिवसृष्टी उभारण्याची घोषणा राज्य सरकारने सन २००२ मध्ये केल्यापासून हे स्मारक केवळ चर्चेतच आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत गदारोळ झाल्यानंतर जागेचा शोध घेण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती. या समितीने अरबी समुद्रात नरिमन पॉईंटपासून २.६ किमी आणि राजभवनापासून १.५ किमी या दरम्यानच्या जागेचा शोध घेतला असून या ठिकाणी १६ हेक्टर जागेवर खडक असल्याचे आढळून आले आहे. स्मारकासाठी ही जागा सुयोग्य असल्याची बाब समितीने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली होती. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आज या जागेची पाहणी केली. त्यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, मुख्य सचिव जंयत बांठिया, आमदार विनायक मेटे, पर्यावरण सचिव वल्सा नायर-सिंह तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी खडक असल्याने भरावही कमी टाकावा लागेल. तसेच हा भाग सीआरझेड चार मध्ये येत असल्याने पर्यावरण विभागाच्या मान्यताही लवकर मिळू शकतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांना यावेळी देण्यात आल्याचे समजते. स्मारकासाठीची जागा आता निश्चित झाली असून त्यासाठी किमान २०-२५ प्रकारच्या परवानग्या आवश्यक आहेत. येत्या २ एप्रिल रोजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जंयती नटराजन मुंबईत येणार असून त्यांच्याशी परवानग्यांबाबत चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.