संसर्ग टाळण्याकरिता पोद्दार रुग्णालयाचा उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा करोनाबाधितांशी संपर्क येऊन अनेकांना त्याची लागण झाल्याचे समोर आल्याने पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाने करोना कक्षात काम करणारे वॉर्डबॉय आणि परिचारिकांचा राबता कमी होण्यासाठी अभिनव शक्कल लढवली आहे. पोद्दार रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णांच्या कक्षात ‘गोलार’ रोबोटच्या साहाय्याने औषधे, जेवण, पाणी, चहा दिला जात आहे. त्यामुळे वॉर्डबॉय आणि कर्मचाऱ्यांचा कक्षातील वावर मर्यादित होऊन त्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी झाला आहे.

करोनाबाधितांवर उपचार सुरू असलेल्या कक्षात कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालूनच जावे लागते. करोना केंद्रात एका वेळी चार-पाच जणांना किट वापरावे लागतात. मात्र रोबोटच्या माध्यमातून सेवा दिल्यामुळे हा खर्च वाचणार आहे. कक्षाबाहेरील एक कर्मचारी रोबोमधील ट्रेमध्ये रुग्णांसाठी जेवण, औषधे ठेवतो. रुग्णालयाच्या नियंत्रण कक्षातून लॅपटॉपद्वारे या रोबोटला सूचना दिल्या जातात.

संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीचा हा रोबो तरुणांनी पालिकेच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार्टअपमधून बनवला असून त्याची किंमत केवळ एक लाख रुपये आहे. कंपनी सामाजिक दायित्वातून हा रोबोट घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या रोबोमुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण आणि त्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे. हा बॅटरीवर चालणारा असून चार ते पाच तास चालतो. तो मोबाइलवरून नियंत्रित केले जाऊ शकतो. १०० मीटर अंतरावरून नियंत्रित केल्यामुळे कोणाचाही त्याच्याशी संपर्क येत नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोबोटला वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव

जी दक्षिण विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव देवेंद्र गोल्हार असून मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांचेच नाव देऊन या रोबोचे गोलार असे नामकरण केले आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर असलेला या रोबोटमध्ये येत्या काळात आम्ही वैद्यकीय साधने बसवणार आहोत, तसेच टॅबही बसवणार आहोत. म्हणजे कॅमेरामधून डॉक्टरांनाही दृकश्राव्य माध्यमातून रुग्णाशी संवाद साधता येईल. ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमानही रोबोटमार्फत तपासता येईल. येत्या काळात एनएनसीआय, रेसकोर्स येथील भव्य उपचार केंद्रातही असाच रोबो अद्ययावत करून ठेवण्यात येणार असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poddar hospital gets robot to serve covid 19 patients zws
First published on: 09-07-2020 at 02:07 IST