सहाव्या इयत्तेतील विद्यार्थिनीची कविता तिच्याच पाठय़पुस्तकात
शाळेच्या पुस्तकात आपली कविता किंवा धडा भविष्यात येईल, असे स्वप्न कुणी विद्यार्थी पाहात असतीलही, पण आपण शिकत असलेल्या आपल्याच तुकडीच्या पाठय़पुस्तकात आपलीच कविता शिकण्यासाठी येणार, अशी कल्पनाही कुणी केली नसेल. ही गोष्ट ‘बालभारती’च्या एका अभिनव उपक्रमामुळे प्रत्यक्षात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यतील कापरा या आदिवासी गावातील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत शिकणाऱ्या सोनाली श्रावण फुपरे या सहावीच्या वर्गातील मुलीने लिहिलेली कविता बालभारतीच्या पाठय़पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
शैक्षणिक अभ्यासक्रम मुलांच्या अभिव्यक्तीला वाव देणारा असावा, या हेतूने यावर्षी प्रथमच राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांची कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण महामंडळाच्या या आवाहनाला हजारो विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. या कवितांतून सोनालीची ‘झाड’ कविता निवडली गेली. ‘कविता करू या’ या सदराखाली ती प्रसिद्ध झाली आहे.
मुलीने खूप शिकावे.
आपल्या मुलीची कविता ‘बालभारती’मध्ये आल्याने तिचे पालकही आनंदले आहेत. सोनालीला लिखाणाची आवड असून तिचे शिक्षकही तिला मदत करतात, असे तिचे वडील श्रावण फुपरे यांनी सांगितले. मला शिक्षणाची संधी मिळाली नाही मात्र सोनालीने खूप शिकावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
सोनालीची चेतनादूत म्हणून निवड
मुंबई : शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या सोनालीची ‘झाड’ ही कविता बालभारतीत आली, पण आता सोनालीची कामगिरी शेतकऱ्यांचे मनोधैर्य उंचावणारीही ठरणार आहे. यवतमाळच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘चेतनादूत’ म्हणून तिची निवड केली आहे.
सोनालीवर गावातूनही कौतुकाचा वर्षांव होत आहे. सध्याच तिने पावसावरही कविता केल्या आहेत, असे तिच्या घरच्यांनी सांगितले.विद्यार्थी शालेय पातळीवर खूप चांगले लिहितात आणि त्यांची मतेही अतिशय प्रभावी असतात. मुलांमधील साहित्यिक मूल्य वाढीस लागावे आणि अभिव्यक्त होण्याची संधी त्यांना मिळावी यासाठी बालभारतीने राज्यपातळीवर राबविलेल्या या उपक्रमाचेही कौतुक होत आहे. सोनालीने लिहिलेली कविता अतिशय साधी आणि समर्पक आहे. तिच्या बालमनाला जाणवलेल्या निसर्गाचे महत्त्व तिने या कवितेते मांडले आहे, असे बालभारतीचे संचालक चंद्रमणी बोरकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poem written by six class girls student girls included in balbharti book
First published on: 28-04-2016 at 03:45 IST