मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. तर, दरेकरांना चौकशासाठी बोलावण्यात आल्यानंतर आज पोलीस स्टेशबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमावर गर्दी करून जोरदार घोषणाबाजी देखील केली.

दरेकर बोगस सदस्य असलेल्या प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेशही सहकार विभागाने जारी केले आहेत. या अगोदर सहकार विभागाने दरेकर यांच्यावर कारवाई का करू नये, याबाबत नोटीस बजावली होती. या प्रकरणी सुनावणीला दरेकर हजर न राहता आपल्या प्रतिनिधीमार्फत युक्तिवाद केला. मात्र हा युक्तिवाद समाधानकारक नसल्यामुळे मुंबई सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले.

१९९७ पासून मजूर असलेल्या दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.