सिद्धिसाई इमारत दुर्घटना : २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाटकोपरच्या सिद्धिसाई इमारतीच्या तळमजल्यावरील अनधिकृत बांधकामावर देखरेख ठेवणाऱ्या अनिल मंडल (२८) या मुकादमाला पार्क साइट पोलिसांनी शनिवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मंडल शितपसाठी सिद्धिसाई इमारतीत मुकादम म्हणून काम करीत होता. तळमजल्यावरील तीन खोल्यांच्या जागेत शितपला जे बदल अपेक्षित होते त्यासाठी आवश्यक असलेले मजूर गोळा करणे, त्यांच्याकडून काम करून घेणे, त्यांना मजुरी देणे आदी जबाबदारी मंडलवर होती. मात्र मंडलकडे स्थापत्यशास्त्राची पदवी नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इमारतीच्या मूळ गाभ्याला किंवा रचनेला धक्का पोहोचेल असे बदल शितप आणि रणजित आगळे यांनी निश्चित केले होते.

मंडल हा शितप आणि आगळे यांच्यातील दुवा होता. जो दोघांच्या सांगण्यानुसार सिद्धिसाईच्या तळमजल्यावरील बदल मजुरांकडून करून घ्यायचा. आगळे वास्तुविशारद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र दुर्घटनेपासून तो फरार आहे. मंडलच्या अटकेने तळमजल्यावर नेमके काय काम सुरू होते याबाबत पोलिसांना अधिक माहिती मिळणार आहे.

* २५ जुलैला सिद्धिसाई इमारत कोसळली. त्यात १७ जण ठार, तर २० जण जखमी झाले होते. इमारतीच्या तळमजल्यावरील तीन खोल्या मुख्य आरोपी शितप व त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या आहेत. काही वर्षांपूर्वी या तीनही खोल्या एकत्र करून त्याने ही जागा खासगी रुग्णालयाला भाडय़ाने दिली होती. काही महिन्यांपूर्वी हे रुग्णालय अन्य जागेत हलविण्यात आले.

* शितपने चौकशीदरम्यान पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या जागेत मोठे रुग्णालय व  शस्त्रक्रिया विभागही सुरू करायचा होता. त्यासाठी तळमजल्यावरील रचना बदलण्याचे काम सुरू होते. शितपने दिलेल्या या माहितीची पोलीस खातरजमा करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested another person in connection with ghatkopar building collapse
First published on: 31-07-2017 at 02:57 IST