करोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लोकांना जीवनाश्यक गोष्टी वगळता इतर कामांसाठी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून वारंवार विनंती करुनही अनेक ठिकाणी लोक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचं चित्र आहे. यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस अशा नागरिकांवर कारवाई करत आहे. मात्र जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिसांवर काही ठिकाणी हल्ले होत असल्याचं समोर येत आहे. नुकतंच मुंबईत अशी एक घटना घडली आहे. एका दुचाकीस्वाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईतील डोंगरी येथे हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउन असतानाही रस्त्यांवर गाड्या काढून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून  डिमेलो रोडवर नाकाबंदी लावण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक धुरत यांना तिथे बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी तिथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीस्वाराने न थांबता पळून जाण्याच प्रयत्न केला.

आणखी वाचा- VIDEO: ‘आम्हाला तुम्ही अडवलेच का?’, औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांकडून पोलिसांना बेदम मारहाण

यावेळी धुरत यांनी दुचाकी पकडून ठेवली होती. तरीही दुचाकीस्वाराने न थांबता दुचाकी पळवली आणि धुरत यांना अक्षरश: फरफटत नेलं. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक धुरत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.