गंभीर त्रुटी उघडकीस; राज्यातील ३३ संस्थांना नोटीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा येथील परिचारिका महाविद्यालयाला ‘शिक्षण शुल्क प्रधिकरणा’चे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम.एन. गिलानी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी अचानक भेट दिली तेव्हा त्यांना धक्काच बसला.. महाविद्यालयाला चक्क टाळे होते. दुसऱ्या एका महाविद्यालयात अधिकृत शिक्षकच नव्हते, तर संस्थाचालकाच्या घरातीलच व्यक्ती शिक्षक असल्याचे दाखविण्यात आले होते. महाराष्ट्रातील बहुतेक परिचारिका महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना रोखीने पगार दिला जातो. फॉर्म १६ दिला जात नाही. त्यामुळे पुरेसे शिक्षक आहेत की नाही याचाच पत्ता नाही.. बाकी नियमांच्या पालनाबाबत आनंदी आनंदच असल्याचे तपासणीत दिसून आले आहे. याप्रकरणी ३३ महाविद्यालयांना खुलासा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

खरे तर, राज्यातील परिचारिका महाविद्यालयांबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच शिक्षण शुल्क प्राधिकरणाकडे अनेक तक्रारी येत असतात. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण शुल्क समिती वेळोवेळी ‘भारतीय परिचारिका परिषदे’कडे अशा महाविद्यालयांच्या तपासणीसाठी आग्रह धरते. सामान्यपणे दर तीन वर्षांतून एकदा राज्यातील सहाशेहून अधिक परिचारिका महाविद्यालयांची कागदोपत्री तपासणी करण्याचे काम ‘राज्य परिचारिका परिषद’ करत असते. देशात व परदेशात परिचारिकांना मोठय़ा प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असल्यामुळे दरवर्षी नवनवीन परिचारिका महाविद्यालये काढण्यात येतात. कागदावर महाविद्यालयासाठी पुरेशी जागा असते, शिक्षक असतात, होस्टेलपासून प्रयोगशाळेपर्यंत सर्व सुविधा दाखविण्यात येतात. तथापि खरोखरच तपासणी केल्यास अनेक परिचारिका महाविद्यालयांनी निकषांचे पालनच केले जात नसल्याचे दिसून येते. शिक्षण शुल्क प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. एन. गिलानी यांनी त्यांना आलेल्या अनुभवाची माहिती वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ राज्यातील सर्व परिचारिका महाविद्यालयांच्या तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी पथक तयार करून गेल्या महिनाभरात ३३ परिचारिका महाविद्यालयांची तपासणी केली असता यातील बहुतेक महाविद्यालयांमध्ये अपुरे शिक्षक, शिक्षकांना रोखीने पगार देणे, बायोमेट्रिक उपस्थितीची व्यवस्था नसणे, होस्टेल व शिक्षणाची व्यवस्था एकाच ठिकाणी नसणे, पुरेशी जागा नसणे तसेच जागेची कागदपत्रेही उपलब्ध करून न देणे आदी गंभीर त्रुटी दिसून आल्या आहेत. याप्रकरणी ३३ महाविद्यालयांना सात दिवसात खुलासा करण्याच्या नोटिसा दिल्यानंतर अजूनपर्यंत एकाही संस्थेने खुलासा सादर केला नसल्याचे डॉ. वाकोडे यांनी सांगितले. याबाबत ‘राज्य परिचारिका परिषदे’शी संपर्क साधला असता त्यांनीही अचानक तपासणी मोहीम राबवली होती व त्यात मोठय़ा प्रमाणत त्रुटी आढळून आल्यामुळे नोटिसा बजावल्याचे परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.

कठोर कारवाईचे आश्वासन

आरोग्य व्यवस्थेत परिचारिकांचे स्थान महत्त्वाचे असून त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. आता संस्थाच जागेवर नसतील आणि शिक्षक कागदोपत्री असतील तर अशा संस्थांमधून उत्तीर्ण होणाऱ्या परिचारिका काय दर्जाच्या असतील, असा सवाल वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांनी उपस्थित केला. यापुढे परिचारिका महाविद्यालयांची सखोल चौकशी करून अपात्र संस्थांवर प्रवेश प्रक्रिया बंद करण्याबरोबरच कठोर कारवाई केली जाईल, असेही संजय देशमुख यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poor governance in nurses college
First published on: 10-11-2017 at 01:27 IST