मुंबई : अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोरपे हे पोलिसांसमोरच पुरावे नष्ट करत होते. त्याकडे डोळेझाक करणे योग्य नव्हते, असे पोलिसांतर्फे  सोमवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. दरम्यान, अटक बेकायदा असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर राखून ठेवला.

पोलिसांनी अटकेपूर्वी नोटीस दिली नसल्याने आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदा असल्याचा दावा कुंद्रा आणि थोरपे यांनी याचिकेद्वारे केला आहे. तसेच अटक आणि कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करून तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर कुंद्रा आणि थोरपेच्या याचिकेवर सोमवारी एकत्रित सुनावणी झाली. त्या वेळी कुंद्रा आणि थोरपे दोघांना अटकेपूर्वी नोटीस देण्यात आली होती. ही नोटीस स्वीकारण्यास कुंद्राने नकार दिला, तर थोरपेनी ती स्वीकारली, असे सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले. कार्यालयातील झडतीच्या कुंद्रा आणि थोरपे यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’मधील संदेशाद्वारे पाठवण्यात आलेल्या अश्लील चित्रफिती, तसेच गुन्ह्य़ाशी संबंधित अन्य साहित्य नष्ट करण्यास सुरुवात केल्यानेच त्यांना अटक करण्यात आल्याचा दावाही पै यांनी केला. तसेच कुंद्राचा तपासात सहकार्य करण्याचा दावा यातून स्पष्ट होतो याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.