विविध मागण्यांसाठी ओला-उबर चालकांचा संप सलग तीसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाकडून करण्यात आला आहे. यामुळे जवळपास ३० हजार टॅक्सींचा व्यवसायही कोलमडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाईन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रूपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे, अशा विविध मागण्या ओला-उबर चालक-मालकांकडून करण्यात आल्या आहेत. सोमवारपासून सुरू झालेले आंदोलन बुधवारीही शमले नाही. त्यामुळे प्रवाशांना ओला-उबर गाडय़ा उपलब्ध होताना अडचणच येत होती. चालकांच्या मागण्यांवर अद्यापही विचार न झाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दिसून आले आहे. ओला-उबरची सेवा घेणाऱ्या प्रवाशांना तीसऱ्या दिवशीही सार्वजनिक वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. सचिन अहिर अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाची यासंदर्भात बुधवारी बैठक होती. परंतु ती  होऊ शकली नाही. गुरुवारी ही बैठक होणार असून त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility of settlement today in the collapse of ola uber drivers
First published on: 25-10-2018 at 03:01 IST