‘कोल्ड मिक्स’चे मिश्रण वरळीत तयार करण्याचा पालिकेचा प्रयत्न; मंजुरीला विलंब झाल्याने पावसाळ्यापूर्वी काम होणे कठीण

मुंबईतील खड्डय़ांवर रामबाण उपाय म्हणून गेल्या वर्षी परदेशातून आणलेले महागडे ‘कोल्ड मिक्स’चे (मिश्रण) तंत्रज्ञान भारतातच स्वस्तात उपलब्ध व्हावे म्हणून पालिकेने आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता कुठे पाय फुटले आहेत. विदेशी मिश्रणासाठी प्रचंड खर्च करण्यापेक्षा वरळीच्या आपल्या कारखान्यात या प्रकारचे मिश्रण बनवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. मात्र इतके महिने पालिका प्रशासन ढिम्म बसून राहिल्याने या योजनेला मंजुरी मिळायला मार्च उजाडावा लागला. परिणामी पावसाळ्यापर्यंत तरी हे तंत्रज्ञान कितपत प्रत्यक्षात येईल याबाबत शंका आहे.

पावसाळ्यानंतर रस्त्यावर पडणारे खड्डे मुंबईकरांसाठी नेहमीचेच. हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने विविध प्रयोग केले आहेत. पावसाळ्यात गरम डांबर वापरता येत नसल्याने थंड मिश्रणाचे शेकडो प्रयोग करूनही पावसाच्या पुढच्याच सरीनंतर खड्डे प्रकट होण्याचे प्रकार घडत. गेल्या वर्षी मात्र महापालिकेने ऑस्ट्रियाच्या तंत्राचे मिडास टच देणारी इकोग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इस्रायलच्या तंत्राचे स्मार्टफिल देणाऱ्या स्मार्टएज या खासगी कंपन्यांकडून घेतले. या मिश्रणाचा प्रयोग यशस्वी ठरला असून या प्रकारचे मिश्रण वरळी येथील कारखान्यात बनवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी एका विदेशी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. विदेशातून आयात केलेले मिश्रण नेहमीच्या डांबर-खडीमध्ये मिसळून हे मिश्रण तयार केले जाईल. त्यामुळे  १८५ रुपये प्रति किलो दराने विकत घ्यावे लागलेले मिश्रण ५० रुपयांपेक्षा कमी दराने तयार करता येईल, असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र पावसाळ्याला तीन महिनेच उरलेले असताना अजूनही पालिकेच्या कारखान्यात हे मिश्रण तयार करण्यासाठी यंत्र हललेले नाही. यासंबंधीचा प्रस्ताव तयार झाला आहे. मात्र त्याला अद्याप आयुक्तांची परवानगी मिळालेली नाही. प्रशासकीय मंजुरीनंतर तो स्थायी समितीमध्ये आणला जाईल. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीला कार्यादेश दिले जातील, असे रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्याला बरेच महिने असून त्याआधी हे मिश्रण तयार होईल, असा दावा या अधिकाऱ्यांनी केला. मात्र प्रशासकीय मंजुरीनंतर कार्यादेश मिळेपर्यंत किमान अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी जातो. त्यानंतर प्रत्यक्षात मिश्रण तयार करण्याचे काम सुरू होईल.

वरळी येथील कारखान्यात हे मिश्रण तयार करण्यासंबंधीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिल्यावर तो पुढच्या एक-दोन आठवडय़ांत स्थायी समितीकडे जाईल. पावसाळ्यात साधारण जुलैनंतर खड्डे भरण्याचे काम सुरू होत असल्याने तोपर्यंत मिश्रण तयार करता येईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत पाचशे ते सहाशे किलोमीटर रस्त्यांचे काम केले गेल्याने या वेळी खड्डे पडण्याचे प्रमाणही कमी असेल, असे ते म्हणाले.

एका खड्डय़ासाठी १५ हजार खर्च

मिडास टच आणि स्मार्टफिल मिश्रणाने भरलेले खड्डे पुन्हा उखडत नसले तरी त्यासाठी लागणारा खर्च किती तरी अधिक आहे. पालिकेच्या कारखान्यात १० रुपये प्रति किलो दराने मिश्रण तयार केले जाते, तर गेल्या वर्षी पालिकेने तब्बल ७० लाख रुपये खर्चून ३८ टन मिश्रण विकत घेतले होते. दोन फूट व्यासाचा खड्डा भरण्यासाठी १४ किलो वजनाच्या सहा ते सात पिशव्या लागल्या, म्हणजेच एका खड्डय़ासाठी १५ हजार रुपयांपर्यंत खर्च आला. त्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यांवरच या मिश्रणाचा उपयोग करण्यात आला.