वीज आयोगाचा ऊर्जा विभागाला आदेश

मुंबई : मुंबई व परिसरात ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या विद्युत यंत्रणेतील बिघाडाबाबत नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने राज्य वीज नियामक आयोगाला अहवाल दिला असून मुंबई महानगर प्रदेशातील वीज पारेषण प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी आणि विविध यंत्रणांमधील समन्वयासाठी कृती गट नेमण्याचा आदेश वीज नियामक आयोगाने शुक्रवारी राज्याच्या ऊर्जा विभागाला दिला.

मुंबई व परिसरात ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे मुंबईतील वीजपुरवठा कित्येक तास ठप्प झाला होता. शिवाय आसपासच्या अनेक भागांत वीजपुरवठा बंद झाला होता. या घटनेची दखल घेऊन उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली होती. या उच्चस्तरीय समितीने राज्य वीज नियामक आयोगाला अहवाल दिल्यानंतर त्याअनुषंगाने वीज आयोगाने शुक्रवारी आदेश दिला.

खारघर-विक्रोळी, कु डुस-आरे या उच्चदाब पारेषण प्रकल्पांसह इतर संबंधित प्रकल्पांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी व संबंधित कामे करणारी वीज कं पनी, महापारेषण, राज्य  भार प्रेषण केंद्र अशा सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवण्यासाठी व अडचणी दूर करण्यासाठी २०१२ च्या धर्तीवर ऊर्जा विभागाने कृती गट नेमावा, असा आदेश वीज आयोगाने दिला आहे. त्याचबरोबर प्रकल्पांची दैनंदिन कामांवर देखरेख ठेवण्यासाठी व त्याबाबतच्या इतर गोष्टींसाठी वीज आयोग एक देखरेख समितीही स्थापन करणार  आहे.