‘शब्दप्रभू’ म्हणून गौरविले गेलेले कवी गोविंदाग्रज म्हणजेच नाटककार- लेखक राम गणेश गडकरी यांनी ११७ वर्षांपूर्वी मराठी पाचवीतील शिक्षण काही दिवस घेतले, ती ‘मराठी मुलांची शाळा क्रमांक एक’ या नावाने पूर्वी ओळखली जाणारी शाळा आज दुरवस्थेत उभी आहे. शाळेच्या या दुरवस्थेमुळेच, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे गडकरींसह या शाळेत काही काळ शिकले की नाही, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
हे प्रश्नचिन्ह मिटले असते, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाग असलेले दोन दिग्गज १८९७ साली शाळूसोबती होते, असा अपूर्व योगायोग नोंदवला गेला असता.. पण तसे अद्याप सिद्ध झालेले नाही.
‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘राजसंन्यास’ आदी नाटके आणि ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह लिहिणाऱ्या राम गणेश गडकरींचा जन्म १ मे १८८५चा; तर प्रबोधनकार ठाकरे हेही त्याच वर्षी, १७ सप्टेंबर रोजी जन्मले. म्हणजे दोघांची वये सारखी. प्रबोधनकारांचे कुटुंब पनवेलला राही; परंतु १८९७च्या प्लेगच्या साथीत प्रबोधनकार त्यांच्या आजोळी कर्जत येथे राहिले होते. अशा वेळी, म्हणजे गडकरी आणि ठाकरे हे दोघेही १२ वर्षे वयाचे असताना कर्जतच्या ‘मराठी मुलांच्या शाळे’त शिकत होते, अशी तोंडी
माहिती मिळते.
तब्बल ११७ वर्षांपूर्वीच्या माहितीची खातरजमा या दोघांच्या ‘शाळा सोडल्याच्या दाखल्यां’तून होऊ शकेल अशा विचाराने आणि गतकालीन मराठी लेखकांबद्दल कायमच असलेल्या कुतूहलयुक्त आदराने, मुंबईत दादर येथे राहणारे ‘लोकसत्ता’चे वाचक-पत्रलेखक अमेय गुप्ते हे त्या शाळेत गेले. कर्जत येथे रायगड जिल्हा परिषदेची ती शाळा ‘जीवन शिक्षण मंदिर’ या नावाने आजही आहे. पण शंभराहून अधिक पावसाळे पाहिलेल्या या शिक्षणमंदिरात, ऐतिहासिक ठरू शकणाऱ्या त्या कागदपत्रांच्या जतनाची व्यवस्था नाही.
जीर्णशीर्ण झालेले, पिवळट कागदांचे तुकडे पडू शकणारी ती दाखल्यांची दप्तरे अमेय गुप्ते यांनी मिनतवारीअंती हलक्या हाताने चाळली. हे दाखले मोडी लिपीत होते आणि गुप्ते यांना मोडी वाचता येत असल्याने गडकरींचा दाखला ते शोधू शकले! पण प्रबोधनकारांचा दाखला शोधूनही इथे मिळाला नाही. त्यामुळे प्रबोधनकार याच शाळेत होते की नव्हते, असा प्रश्न निर्माण होतो.
पनवेलहून काही दिवस कर्जतला त्यांचा मुक्काम होता हे खरे, पण तेवढय़ा मुक्कामात पनवेलऐवजी कर्जतच्या जि. प. शाळेत त्यांनी प्रवेश घेतला होता की नव्हता? कागदपत्रांअभावी हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहणार आहे.
राम गणेश गडकरी यांनी शिक्षण घेतलेल्या कर्जतच्या शाळेची दुरवस्था झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
प्रबोधनकार ठाकरे आणि शब्दप्रभू गडकरी शाळूसोबती?
‘शब्दप्रभू’ म्हणून गौरविले गेलेले कवी गोविंदाग्रज म्हणजेच नाटककार- लेखक राम गणेश गडकरी यांनी ११७ वर्षांपूर्वी मराठी पाचवीतील शिक्षण काही
First published on: 19-01-2014 at 04:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabodhankar thakre ram ganesh gadkari school mets