प्रत्युषाने आत्महत्येपूर्वी गर्भपात केला असला तरी त्याचा तिच्या आत्महत्येशी काहीही संबंध नसल्याची माहिती याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. प्रत्युषाचा प्रियकर राहुलराज सिंग याच्यावर आम्ही या कारणासाठी गुन्हा दाखल केला नव्हता. आमचा तपास तिच्या गर्भपाताच्या घटनेला धरून सुरू नाही. प्रत्युषाने आत्महत्येचे पाऊल उचलण्यामागे अन्य कारणे असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले.
प्रत्युषाने आत्महत्येपूर्वी गर्भपात केल्याचे वैद्यकीय निष्कर्षांत निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले होते. राहुलराज सिंग याने प्रत्युषाच्या बाळाचे पालकत्व नाकारल्याने तिने आत्महत्या केली का, या दिशेने पोलीस तपास करणार का, याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. ‘बालिका वधू’फेम प्रत्युषा बॅनर्जी हिने १ एप्रिल रोजी तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रत्युषाचा प्रियकर राहुल याच्याविरोधात बांगुरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्युषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर प्रत्युषाच्या पेशींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते. या अहवालात प्रत्युषाने अलीकडच्या काळात गर्भपात केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रत्युषाने गर्भपात करून घेतला की अपघाताने तिचा गर्भपात झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या गर्भाचे पालकत्व कोणाचे होते, हे तपासणे पोलिसांना आव्हानात्मक ठरणार आहे.



