शैलजा तिवले

शहरातील खासगी डॉक्टरांचा ‘कोव्हॅक्सि’ लस घेण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी जे. जे. रुग्णालयात ७० जणांनी ही लस घेतली असून, तेथे आत्तापर्यंत ४९५ जणांना ही लस देण्यात आली आहे.

मुंबईत कोव्हॅक्सिन लशीचे एकमेव केंद्र असलेल्या जे. जे. रुग्णालयात सुरुवातीला केवळ जे. जे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे यादीत असायची. त्यात या लशीची परिणामकारकता आणि सुरक्षिततेबाबत साशंकता असल्याने सुरुवातीच्या काही दिवसांत अत्यल्प प्रतिसाद होता. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी तर केवळ १३ जणांनी ही लस घेतली होती.

कोविन अ‍ॅपमधील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबईत कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेण्याचा पर्याय पालिकेने उपलब्ध केला. परिणामी यादीत नाव नसले तरी आरोग्य कर्मचारी त्यांच्या सोईने जवळील केंद्रावर जाऊन लस घेत आहेत. याचा फायदा कोव्हॅक्सिनच्या लसीकरणाला झाला असून खासगी रुग्णालयातील अनेक कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून लसीकरणासाठी जे. जे. रुग्णालयात येत आहेत.

‘यादीतील कर्मचाऱ्यांना लस देण्याचे बंधन सुरुवातीला होते. त्यातही केवळ जे. जे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे होती, परंतु यादीबाह्य़ नावे घेण्यास परवानगी दिल्यापासून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खासगी डॉक्टर कोव्हॅक्सिन घेण्यासाठी येत आहेत. काही पालिकेचे डॉक्टरही ही लस घेण्यासाठी आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे’, असे जे. जे. रुग्णालयातील सामाजिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ललित संख्ये यांनी सांगितले.

सरकारने परवानगी दिलेल्या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. ‘कोव्हॅक्सिन’मध्ये मृत स्वरुपातील विषाणू असल्याने यातून प्रतिपिंडे अधिक तयार होतील असे मी केलेल्या लशींच्या अभ्यासात आढळल्याने मी ही लस घेण्यासाठी गेलो. तसेच भारतीय तंत्रज्ञानाला पाठिंबा आपण द्यायला हवा, असाही एक विचार यामागे होता. माझी पत्नी, मुलगा आणि रुग्णालयातील जवळपास २० कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली असून एकालाही दुष्परिणाम आढळलेले नाहीत, असे स्त्रीरोगतज्ज्ञ आणि ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट’चे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर नाईक यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये सर्वाधिक लसीकरण

राज्यात कोव्हॅक्सिनची लस मुंबईसह अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि सोलापूर या सहा केंद्रांवर दिली जात आहे. अमरावतीमध्ये चांगला प्रतिसाद असून गेले काही दिवस उद्दिष्टाच्या १०० टक्क्य़ांहून अधिक लसीकरण झाले आहे. आत्तापर्यंत राज्यात ४१३२ जणांनी ही लस घेतली असून यातील सुमारे २७ टक्के लाभार्थी अमरावतीतील आहेत. गुरुवारी नागपूरमध्येही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला असून उद्दिष्टाच्या १४८ टक्के लसीकरण झाले आहे.

‘तो’ पर्याय बंद

कोविन अ‍ॅपमधील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्य यादीत नाव नसले तरी आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव यादीत जोडण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु मागील तीन दिवसांपासून हा पर्याय बंद केला आहे. त्यामुळे ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे रुग्णालयाने नोंदणीसाठी पाठविली होती, परंतु अ‍ॅपमध्ये दिसत नाहीत, अशा लाभार्थ्यांना लस देता येत नाही. परिणामी इथून पुढे लाभार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.