उच्च न्यायालयात पोलिसांचा दावा

मुंबई : ‘अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणाच्या तपासात व्यावसायिक राज कुंद्रा सहकार्य करत नव्हता. कार्यालयाच्या झडतीदरम्यान तो व त्याचा सहकारी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील अश्लील चित्रफिती नष्ट करत होते. त्यामुळेच कुं द्राला अटक करण्यात आली’, असा दावा पोलिसांनी गुरुवारी उच्च न्यायालयात केला.

ही अटक बेकायदा असल्याचे सांगत आरोपी कुंद्राने उच्च न्यायालयात याचिका केली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७(ए)नुसार करण्यात आलेल्या कारवाईचे पोलिसांनी समर्थन केले आहे. कुंद्राला अटक करण्यापूर्वी कायद्यानुसार नोटीस देण्यात आली होती. मात्र त्याने ती घेण्यास नकार दिला, असा दावा पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला.

दरम्यान, अटक करण्यापूर्वी पोलीस संशयिताला चौकशीसाठी बोलावतात. त्यासाठी दोन आठवडे आधी नोटीस पाठवली जाते, परंतु कुंद्राला दोन दिवसही देण्यात आले नाहीत. कुंद्राच्या कार्यालयाची १९ जुलैला झडती घेण्यात आली. त्यावेळी तो स्वत: तिथे होता आणि पोलिसांना चौकशीत सहकार्य करत होता. त्याच दिवशी सायंकाळी पोलिसांनी त्याला सोबत येण्यास सांगितले. पोलीस ठाण्यात त्याला अटक करण्यात आल्याचा दावा न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी कुंद्राच्या वतीने करण्यात आला.

मानहानीकारक वृत्त प्रसिद्धीस मज्जाव करावा, शिल्पा शेट्टीची याचिका

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर समाजमाध्यमे व संकेतस्थळांवरून मानहानीकारक माहिती प्रसिद्ध करण्यास मज्जाव करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत शिल्पाने समाजमाध्यमांसह वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांना प्रतिवादी केले आहे. राज कुंद्राचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळल्यानंतर शिल्पाने ही याचिका केली आहे.

वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित वृत्त अधिक रंजक करून प्रसिद्ध के ले जाते, त्यामुळे प्रतिवाद्यांना आपल्याविषयी चुकीचे आणि मानहानी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यापासून मज्जाव करण्याची मागणी शिल्पाने याचिकेत केली. आपल्याबाबतची चुकीची माहिती संके तस्थळांवरून काढून टाकावी, समाजमाध्यावरूनही याबाबतच्या चित्रफिती हटवण्यात याव्यात, तसेच माफी मागण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिल्पाने केली आहे.