एका अल्पवयीन मुलीचाही समावेश
भरवस्तीत चालणाऱ्या वेश्या अड्डय़ावर छापा घालून भांडुप पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह एजंटला अटक केली आहे
भांडुपच्या सोनापूर भागातील राजीव गांधी वसाहतीत छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीरंग नाडगौडा हे पथकासह तेथे पोहोचल्यावर तेथून आरोपींनी मुलींना इतरत्र हलवले होते. पोलिसांनी मग या भागात धाडसत्र  सुरू केल्यावर वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चौघा तरुणींना एका घरात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चौघींची सुटका करुन कुंटणखाना चालविणारी महिला, मुलींची विक्री करणारा एजंट आणि अन्य एक कर्मचारी यांना अटक केली. या सर्वांवर ‘पिटा’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता सुरू झालेली कारवाई मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे चार तरुणींना नवजीवन मिळाले आह़े