नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाण्यात प्रमाणापेक्षा अधिक रसायने सोडण्यात येत असल्याने व सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीमध्ये सोडले जात असल्याने ही नदी सर्वतोपरी प्रदुषित झाली सध्या तीची स्थिती ‘मृत’ या प्रकारात मोडत असल्याचा आरोप जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. न्यायालयानेही या याचिकेची गंभीर दखल घेत राज्य सरकार, नाशिक पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गोदावरीमध्ये सुमारे ६० दशलक्ष सांडपाणी प्रक्रियेविनाच सोडण्यात येते. तसेच अन्य नाल्यांमधूनही सांडपाणी नदीमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे नाशिककरांची जीवनवाहिनी असलेली गोदावरी प्रदुषणाच्या विळख्यात अडकली आहे. ही नदी स्वच्छ करण्यात यावी व त्यामध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येऊ नये यासाठी राजेश पंडित, नागसेन पगारे यांनी अ‍ॅड्. प्रवर्तक पाठक यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. नदीच्या पाण्यामधील ऑक्सिजन विरघळण्याची क्षमता काही ठिकाणी अजिबात नाही. तर काही ठिकाणी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतामध्ये ऑक्सिजन विरघळण्याची क्षमता कितीतरी अत्यल्प असल्याने शास्त्रीयदृष्टय़ा गोदावरी ‘मृत’ झाली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.