शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय न झाल्यास निर्णायक लढाई करण्याचा नवा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असला तरी पूर्वानुभव लक्षात घेता शिवसेनेने ऐनवेळी माघार घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.

भाजपबरोबर युतीत शिवसेना सडली किंवा भविष्यात भाजपबरोबर कधीही युती करणार नाही, असे महापालिका निवडणूक प्रचारात जाहीर करणारे उद्धव ठाकरे नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे बघायला मिळाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्दय़ावर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेने आधी आक्रमक भूमिका घेतली होती, पण तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यावर शिवसेना आमदार कामकाजात सहभागी झाले होते.

शिवसेनेचा आतापर्यंतचा इतिहास बघितल्यास अनेकदा इशारे देण्यात आले, पण नंतर त्यावरून फारसे ताणून धरण्यात आले नाही. पाकिस्तानी कलाकार किंवा क्रिकेटपटूंपासून अनेकदा हे अनुभवास आले.

कर्जमाफी न झाल्यास लढाई करणार हा इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिले आहे. सरकारमध्ये बसून इशारे कसले देता, कर्जमाफी करून दाखवा, असा टोलाही राणे यांनी हाणला. कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक असताना शिवसेनेने मध्येच लढाईतून माघार घेतली होती याकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्ष वेधले.

वस्तू आणि सेवा करावरून शिवसेनेने विरोधी भूमिका घेऊ नये म्हणून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. भाजपचे मंत्री घटनाबाह्य़ शक्तींशी चर्चा करणार असल्यास व ते अंतिम निर्णय घेणार असल्यास जीएसटीसाठी विशेष अधिवेशनाची गरजच काय, असा सवालही विखे-पाटील यांनी केला.