पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनातील प्रश्नोत्तराचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी विधान भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे संदीप बजोरिया हे दोन आमदार मंगळवारी हमरीतुमरीवर आले. काही ज्येष्ठ आमदारांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ घडला, अन्यथा हाणामारीपर्यंत प्रकरण गेले असते, असे समजते.
विधान भवनाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडल्यावर काही कारणावरून शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे बजोरिया यांच्यात धुसफूस झाली. हा वाद एवढा वाढला की उभयतांनी परस्परांना जोरादार शिवीगाळ केली.
‘बघून घेतो, तू काय करणार’ अशा शब्दांत परस्परांना आव्हाने देत उभयतांमध्ये बाचाबाची झाल्याचे उपस्थित आमदाराकंडून सांगण्यात आले. वाद भडकल्यानंतर एका क्षणी तर बजोरिया हे पाटील यांच्या अंगावर धावून गेले, असे काही आमदारांनी सांगितले.  दिवाकर रावते, मोहन जोशी, कपिल पाटील आदी आमदारांनी मध्ये पडून उभय नेत्यांना शांत केल्याने पुढील अनर्थ घडला.
बजोरिया यांची वर्तवणूक चांगली नव्हती. ते अंगावर धावून आल्याचे शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितले. तर काहीही संबंध नसताना पाटील यांनी शिवीगाळ केल्याचे आमदार बजोरिया यांचे म्हणणे होते.