एकीकडे राज्याचा गृह विभाग महिलांच्या सुरक्षितेविषयी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच ठाण्यात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून घरी परतणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर सोमवारी रात्री चाकूहल्ला झाला. मात्र, या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ाची नोंद करण्याऐवजी कोपरी आणि ठाणे रेल्वे पोलिसांमध्ये हद्दीवरून चांगलाच वाद रंगला होता. विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे रेल्वे पोलिसांना या घटनेबाबत थांगपत्ताही नव्हता. त्यामुळे ठाणे रेल्वे पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, ठाणे पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर कोपरी पोलिसांनी गुन्हा करून तपास सुरू केला.
ठाणे येथील आनंदनगर भागात राहणारी एक २० वर्षीय युवती नवी मुंबईमधील एका कंपनीत कामाला आहे. सोमवारी रात्री १० वाजता घरी परतत असताना ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर नरेंद्र शिवाजी कवे (२४) या तरुणाने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. तसेच तिसरा वार करत असताना चाकू पकडल्याने तिच्या दोन्ही हातालाही दुखापत झाली आहे. या युवतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नरेंद्र याने विषारी औषध प्राशन केल्याने त्याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध असून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे सोमवारी त्याने तिला लग्नाबाबत विचारले असता, तिने नकार दिला. यातूनच त्याने तिच्यावर हा हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलापासून अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर ठाणे रेल्वे पोलीस स्थानक आहे. मात्र, ही घटना घडल्यानंतर सुमारे दीड ते दोन तासांचा अवधी उलटला तरीही रेल्वे पोलिसांना काहीच थांगपत्ता नव्हता. त्यामुळे ठाणे रेल्वे पोलिसांच्या निष्क्रियतेचे दर्शन या घटनेतून घडले. दरम्यान, थर्टीफस्टच्या पाश्र्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे पुलापासून जवळच असलेल्या रस्त्यावर गस्त घालणाऱ्या कोपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उशिराने जागे झालेले रेल्वे पोलीसही घटनास्थळी आले. मात्र, गुन्हा दाखल करण्यावरून दोघांमध्ये हद्दीचा वाद सुरू झाला.
 रात्री उशिरापर्यंत कोपरी पोलिसांकडून रेल्वेच्या हद्दीत ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत होता. विशेष म्हणजे पादचारी पुलावर अशा प्रकारची घटना घडलीच नसल्याची उत्तरे ठाणे रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत होती.
दरम्यान, या घटनेबाबत वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोपरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कोपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासही सुरू केला आहे.