दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व मंत्र्यांनी आपले वेतन द्यावे अशी सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली असता अन्य मंत्र्यांनी ती हसण्यावरी नेली. मात्र लगेचच त्यांनी एक महिन्याच्या ५७ हजार रुपये वेतन, भत्त्याचा धनादेश दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन अन्य मंत्र्यांची पंचाईत केली. कारण अन्य मंत्र्यांनाही आर. आर. आबांचा कित्ता गिरवावा लागणार आहे.
आर. आर. पाटील यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल अन्य मंत्र्यांमध्ये नेहमीच असूयेची भावना असते. कधी आणि कशाला चांगली प्रसिद्धी मिळेल याची मेख आर. आर. आबांना चांगलीच अवगत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्र्यांनी आपले महिन्याचे वेतन द्यावे, अशी सूचना आर. आर. आबांनी करताच त्यांची मंत्रिमंडळात खिल्ली उडविण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांचे तर मंत्री आणि आमदारांचे एक महिन्यांचे वेतन द्यावे अशी सूचना आर. आर. यांनी करताच माजी उपमुख्यमंत्र्यांकडून दोन महिन्यांचे वेतन घ्यावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यावर आबांची प्रतिक्रिया काहीशी संतप्तच होती, असे काँग्रेसच्या मंत्र्यांकडून सांगण्यात आले. सरकारी अधिकारी दोन दिवसांचे वेतन देणार आहेत. कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. मग मंत्र्यांनी का मागे राहावे, असा विचार करून आर. आर. पाटील यांनी महिन्याच्या ५७ हजार रुपयांचा वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठवून दिला आणि अन्य मंत्र्यांसाठी ‘आदर्श’ उभा केला. एका मंत्र्याने वेतन दिले आणि अन्य मंत्र्यांनी दिले नाही तर त्याची परत चर्चा सुरू होणार, यामुळे अनेकजण खंतावले आहेत.