रेल्वे अर्थसंकल्पाने सर्वाचीच निराशा झाली आहे. महाराष्ट्रासह मुंबईकडे या अर्थसंकल्पाने दुर्लक्ष केल्याची भावना सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. ऑक्टोबर २०१२ पासून चार वेळा भाडेवाढ झाल्यामुळे या वेळी अर्थसंकल्पामध्ये प्रवासी भाडेवाढ झालेली नाही. प्रवाशांना सुविधा देण्याची घोषणा केली असली तरी निधीअभावी त्यांची अंमलबजावणी होऊ शकत नसल्याची कबुली रेल्वेमंत्र्यांनीच दिली आहे. मुंबई प्रमाणेच महाराष्ट्राच्या वाटय़ालाही अर्थसंकल्पामध्ये काहीच मिळत नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे. केंद्र शासन नेहमीच महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक देते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
मुंबईसह महाराष्ट्रातून रेल्वेला चांगला महसूल मिळत असताना अर्थसंकल्पात मात्र राज्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. मुंबईला काहीही न देणाऱ्या या अर्थसंकल्पाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या खासदारांनी जनतेला उत्तर द्यावे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे. तर, देशातील दुर्गम भागाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आल्याचे रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे. प्रवासी भाडय़ात थेट वाढ केली नसली तरी इंधन दरवाढीच्या अधिभाराच्या नावाखाली लवकरच भाववाढ होणार यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली.