तिकीट तपासनीसांकडे प्रवाशांचे पत्ते व संपर्क क्रमांकाची नोंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यानंतर तिकीट तपासनीसांच्या हातावर दंडाच्या रकमेपोटी ५००-१०००ची नोट ठेवणाऱ्या प्रवाशांना आता चांगलाच चाप बसणार आहे. दंड ठोठावलेल्या प्रवाशांकडून अशा नोटा जरूर घ्या! दंडाची रक्कम वळती करून त्यांना उरलेली रक्कमही परत द्या! पण या नोटांचे क्रमांक, प्रवाशाचे नाव, त्याचा पत्ता, ओळखपत्र क्रमांक आणि मोबाइल नंबर यांची नोंद करा, असे आदेश रेल्वे बोर्डाने सर्व तिकीट तपासनीसांना दिले आहेत. त्यामुळे तिकीट तपासनीसांचे काम वाढणार असले, तरी बनावट नोटा मिळाल्यानंतर त्यांच्या खिशातून पैसे जाण्याऐवजी त्यांना या नोटा सोपवणाऱ्या प्रवाशांना शोधता येणार आहे.

[jwplayer iFPW53nk]

देशभरात उसळलेल्या ‘चलनकल्लोळा’नंतर केंद्र सरकारने ५००-१०००च्या बाद झालेल्या नोटा रेल्वेमध्ये स्वीकारल्या जातील, असे जाहीर केले. त्यानंतर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट तपासनीसांकडे ५०० व १००० रुपयांच्या नोटा देण्यास सुरुवात केली. विनातिकीट प्रवासासाठी २५० रुपये आणि पुढील स्थानकापर्यंतच्या तिकिटाची रक्कम एवढा दंड आकारला जातो. त्यामुळे तिकीट तपासनीसांना लोकांना सुटे पैसे द्यावे लागत होते. सुटय़ा पैशांची कटकट नको, म्हणून अनेकांनी प्रवाशांना समज देऊन सोडण्यास सुरुवात केली. तसेच काही तिकीट तपासनीसांनी स्वीकारलेल्या ५००-१००० रुपयांच्या नोटांपैकी काही नोटा बनावट असल्याचेही आढळले.

हा प्रकार टाळण्यासाठी रेल्वे बोर्डाने आता सर्वच विभागांमधील तिकीट तपासनीसांसाठी आदेश काढले आहेत. या आदेशांनुसार आता तिकीट तपासनीसांना ५०० व १००० रुपयांच्या नोटा देणाऱ्या प्रवाशांची माहिती नोंदवून घ्यावी लागणार आहे. एखाद्या प्रवाशाने २५० रुपयांच्या दंडापोटी या नोटा दिल्या, तर त्या स्वीकारण्यास हरकत नाही. पण त्या प्रवाशाचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, ओळखपत्र क्रमांक आणि त्याने दिलेल्या नोटेचा क्रमांक तपासनीसांना पावतीवर लिहायचा आहे. त्यामुळे ही माहिती तपासनीसांबरोबरच प्रवाशांकडेही राहणार आहे. प्रवाशाने दिलेली नोट बनावट आढळल्यास प्रवाशाने दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधून त्याच्याकडून वैध नोट बदलणे सोपे जाईल आणि तपासनीसांना त्याचा भरुदड पडणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे. मध्य रेल्वेवर याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

[jwplayer iZypQfga]

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway fine issue after note banned
First published on: 18-11-2016 at 02:03 IST