पश्चिम रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्थानकाचे सांस्कृतिक स्थळात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी युनेस्कोशी सामंजस्य करार केला. युनेस्कोकडून अर्थसाहाय्य घेऊन वांद्रे रेल्वे स्थानकाचे सांस्कृतिक स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे.
वांद्रे रेल्वे स्थानक हेरिटेज वास्तू म्हणून ओळखली जाते. त्याचा विकास आणि संवर्धन युनेस्कोच्या सहकार्याने केला जाणार आहे. शुक्रवारी वांद्रे स्थानकात झालेल्या कार्यक्रमात युनेस्कोचे संचालक शिगेरू आओयागी, रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक मून गोयल यांनी प्रभू यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या विकोस प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानकाच्या परिसराचा, इमारतीचा विकास केला जाणार आहे. रेल्वे स्थानकात वाद्रेचा इतिहास थ्रीडी तंत्रात सादर केला जाणार आहे.  वांद्रे स्थानक हे दीडशे वर्षे जुने असून गॉथिक शैलीत त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर १८६४ रोजी ते बांधण्यात आले. त्यानंतर २४ वर्षांनी त्याच्या इमारतीचे बांधकाम झाले. दरम्यान, सीएसटीप्रमाणे खार स्थानकातही वायफाय उपलब्ध करून देण्याची घोषणा प्रभू यांनी केली.