महापालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेचा परिणाम

पाऊल टाकण्याएवढीही मोकळी जागा शोधावी लागत असलेल्या रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते मंगळवारी अचानक रुंद झाल्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. पालिकेने फेरीवाल्यांविरोधात हाती घेतलेल्या मोहिमेचा हा दृश्यपरिणाम होता. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटपर्यंतच्या परिसरातील फेरीवाल्यांना उठवण्यात आले असून ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहील.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर महानगरपालिकेने काही भागातील फेरीवाले हटवण्याचा प्रयत्न केला. दिवाळीआधी दादर रेल्वेस्थानक तसेच पादचारी पुलावरील फेरीवाले उठवले गेले. मात्र दिवाळीत पालिकेची कारवाई ढिली पडली आणि दादर पुन्हा फेरीवाल्यांनी गजबजले. मनसेने शनिवारपासून कारवाई हाती घेतल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला. एकीकडे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून दुसऱ्या बाजूने पालिकेनेही कारवाई तीव्र केली आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर रुजू झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी व मंगळवारी रेल्वे स्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंगळवारी दुपापर्यंत बोरिवली, अंधेरी, दादर, वांद्रे ही रेल्वेस्थानके फेरीवालामुक्त झाली. रेल्वे आणि पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. त्यात रेल्वेस्थानक व त्याबाहेरील फेरीवाल्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यासाठी या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याबाबत चर्चा झाली. मात्र मंगळवारी केवळ पालिकेने कारवाई हाती घेत प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेरील परिसर फेरीवालामुक्त केला.

कडक धोरण

* फेरीवाल्यांचा प्रश्न हा सामाजिक व आर्थिक बाबींशी निगडित असला तरी मुंबईकरांची सुरक्षाही महत्त्वाची असल्याने पालिकेने फेरीवाल्यांविरोधातील धोरण कडक केले आहे.

* अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील दंड वाढवण्यात आला असून फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी वॉर्ड अधिकाऱ्यांना अधिक गाडय़ा भाडय़ाने घेण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

* फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात आलेला दंड हा कारवाईसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या किमान दीडपट असावा, अशी सूचना पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

* परवाना विभागातील कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.