विदर्भ व कोकणात गेल्या ४८ तासांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने मुंबई व परिसरालाही अक्षरश झोडपून काढले आहे. शनिवारी पहाटेपासून शहरात पावसाचा संतत‘मारा’ सुरू झाला. या संततमाऱ्याने मुंबईकरांना वेठीस धरले नसले तरी रस्त्यांची मात्र धुळधाण उडाली आहे. या पावसाचा उपनगरीय रेल्वेवाहतूक सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. तीनही मार्गावरील वाहतूक काही अपवाद वगळता सुरळीत सुरू होती. मात्र, रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे बेस्ट, टॅक्सी व रिक्षातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप सोसावा लागत होता. अंधेरी येथील एका चाळीच्या घराच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने एका नऊ वर्षांच्या मुलीला जीव गमवावा लागला. येत्या ४८ तासांत मुंबईत मध्यम स्वरुपाचा तर कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
पूर्व किनारपट्टीवर ओरिसाजवळ काही अंतराने कमी दाबाचे पट्टे तयार होऊन उत्तरेकडे सरकतात. या पट्टय़ामुळे राज्यभर पाऊस पडतो. यावर्षी हे कमी दाबाचे पट्टे सातत्याने तयार होत असल्याने पावसाने उसंत घेतलेली नाही. सध्या मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या पट्टय़ामुळे विदर्भासह राज्यभर जोरदार पाऊस पडत आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक डॉ. एन. वाय. आपटे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. शनिवारी मुंबईत जोरदार पाऊस झाला असला तरी पुढचे दोन दिवस पावसाचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे राहील, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
शनिवारी सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासात कुलाबा येथे ७१ मिमी तर सांताक्रूझ येथे ७९ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री साडेआठपर्यंत कुलाबा येथे ३२.५ मिमी तर सांताक्रूझ येथे ६१.४ मिमी पाऊस पडला. हिंदमाता, सायन रोड क्रमांक २४, एलफिन्स्टन रोड या भागात सकाळी पाणी साचले होते. त्यामुळे बेस्ट बसचे या ठिकाणाहून जाणारे मार्ग बदलण्यात आले. मात्र शनिवारी तीनही रेल्वेमार्गावरील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत असल्याने प्रवाशांना सुखद धक्का बसला.
अंधेरी येथे जुहू गल्लीमध्ये फारूक मशिदीजवळ असलेल्या एक मजली चाळीच्या वरच्या मजल्यावरील प्लास्टर आणि विटांचा भाग शनिवारी सकाळी कोसळला. प्लास्टर डोक्यावर पडल्याने रजनी गुप्ता (९) ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
‘विहार’
ही भरणार
तुळशी, तानसा आणि मोडक सागर तलावानंतर आता विहार तलावही लवकरच भरण्याची शक्यता आहे. आठवडय़ाभराच्या विश्रांतीनंतर गेले चार दिवस सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे तलावांच्या पातळीत वाढ झाली आहे. यावर्षी दणक्यात सुरुवात केलेल्या मान्सूनच्या पावसाने संततधार सुरू ठेवल्याने जुलैच्या दुसऱ्याच आठवडय़ात १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तुळशी तलाव भरून वाहू लागला. त्यानंतर दोनच दिवसांनी तानसा तलाव पूर्व भरला. या आठवडय़ात बुधवारी सकाळी साडेसहा वाजता मोडक सागरही भरून वाहू लागला. विहार तलावाची भरण्याची पातळी ८० मीटर असून आता पाण्याची पातळी ७९.२ मीटपर्यंत पोहोचली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हा तलावही भरून वाहू लागेल. शहराला पाणीपुरवठा करणारे भातसा आणि अप्पर वैतरणा हे मुख्य तलाव भरण्यास आणखी कालावधी लागेल.