येणार! येणार म्हणत अखेर पावसाचं आगमन झालं आहे. डोंबिवलीत पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्यात. कल्याण आणि बदलापुरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू लागला आहे. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जाणवणारा प्रचंड उकाडा कमी होण्यास मदत होणार आहे. कल्याण आणि बदलापुरात मुसळधार पाऊस कोसळतो आहे अशी माहिती आहे. तर डोंबिवलीत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मुंबईतल्या अंधेरी, जोगेश्वरी भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. पाऊस आल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कल्याणमध्ये पावसाच्या सरी कोसळू लागल्याने काही भागांमध्ये लाईटही गेले आहेत. वातावरणात गारवा आल्याने नागरिक काहीसे सुखावले आहेत. डोंबिवलीत लाईट गेले आहेत, तर ठाण्यातही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. विरारमध्येही पावसाला सुरूवात झाली आहे.

दरम्यान मंगळवारी ११ जून रोजी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वेधशाळांच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई व किनारी भागामध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाले की त्याच्या परिणामी किमाऱ्यालगतच्या प्रदेशांमध्ये पाऊस सुरू होतो. कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता जास्त असेल तर वादळी वाऱ्यांसह पाऊस येतो, जी स्थिती सध्या दिसत आहे. स्कायमेटनंही अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याचे व त्यांची तीव्रता वाढत असल्याचे म्हटले आहे. परिणामी ११ व १२ जून रोजी मुंबईत पाऊस कोसळण्याचा व कदाचित वादळी वारे वाहण्याचा अंदाजही स्कायमेटनं व्यक्त केला आहे.