Raj Kundra Case : मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरावर टाकला छापा

सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा यांना रात्री अकराच्या सुमारास अटक केली. कुंद्रा यांच्याविरोधात अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याचा आरोप आहे.

Shilpa Shetty home raided by Mumbai Crime Branch
दुपारच्या सुमारास पोलिसांनी टाकला छापा (प्रातिनिधिक फोटो)

उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर आज मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राज यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला. यासंदर्भातील वृत्त डीएनए या वेबसाईटने दिलं आहे. शुक्रवारी मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केलं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.

नक्की वाचा >> पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…

राज कुंद्रांच्या यस बँक खात्यावरुन युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यावर किती पैसे वळवण्यात आले यासंदर्भातील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यायालयाने सांगितलं. याच तपासासाठी पोलिसांना आता न्यायालयाने चार दिवसांचा कालावधी दिला असून २८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

त्या वेबसाईटसंदर्भात पोलिसांनी सुरु केला तपास…

समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता हॉटशॉर्ट अ‍ॅपबरोबरच राज कुंद्रांच्या मालकीच्या आणखीन एका वेबसाईटसंदर्भातील तपास सुरु केलाय. कुंद्रा यांनी जेएल स्ट्रीम्ससोबत सुरु केलेल्या एका वेबसाईटचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शिल्पा शेट्टीने या वेबसाईटसाठी एक जाहिरातही शूट केली होती. पाच महिन्यांपूर्वी शिल्पाने या वेबसाईटसाठी प्रमोशनल व्हिडीओ शूट केलेले. या वेबसाईटवरही अडल्ट कंटेट उपलब्ध असून ही वेबसाईट अद्यापही भारतामधून सुरु असल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळेच आता ही जाहिरात आणि या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा काय संबंध आहे याबद्दल पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

कार्यालयावर छाप्यात सापडला बराच डेटा

मुंबई पोलिसांनी यापूर्वीच अंधेरी पश्चिमेमध्ये असणाऱ्या राज कुंद्रांच्या वियान कंपनीच्या कार्यालयामध्ये छापा टाकून तेथून मोठ्याप्रमाणात डिजीटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. या छाप्यामध्ये तपास यंत्रणांना बऱ्याच मोठ्याप्रमाणात माहिती आणि साहित्य सापडलं आहे. हा डेटा काही टेराबाईट्समध्ये आहे यावरुनच या छाप्यामध्ये पोलिसांना तपासासाठी आवश्यक असणारे पुढील धागेदोरे सापडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाई करण्याआधीच मोठ्या प्रमाणामध्ये डेटा डिलीटही करण्यात आला असून आता गुन्हे शाखेकडून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने डेटा रिकव्हरीचा प्रयत्न केला जात आहे.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

२० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स, कोट्यावधींची कमाई

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अश्लील चित्रपट बनवण्याचं काम राज कुंद्रा हे ऑगस्ट २०१९ पासून करत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी १०० हून अधिक अश्लील चित्रपटांची निर्मिती केलीय. गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुंद्रांनी या उद्योगामधून कोट्यावधी रुपये कमवल्याचंही सांगितलं जात आहे. ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून हे अश्लील चित्रपट अपलोड करुन प्रसारित करण्यात येत होते त्या अ‍ॅपला २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स होते. यामधूनच कुंद्रा यांना कोट्यावधी रुपये मिळायचे, असं गुन्हे शाखेच्या सुत्रांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा >> अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले, “तो कंटेट पॉर्न नाही तर…”

…म्हणून केली अ‍ॅपची निवड

वेबसाईटऐवजी कुंद्रांच्या कंपनीने अ‍ॅपचा पर्याय निवडण्यामागेही एक कारण असल्याचं समोर आलं आहे. वेबसाईटच्या तुलनेत अ‍ॅप हे वापरण्यास अधिक सोयीस्कर ठरेल या विचारातून वेबसाईटऐवजी अ‍ॅप सुरु करुन त्या माध्यमातून या चित्रपटांचं वितरण करण्यात तआलं. तसेच वेबसाईटवर कारवाई झाल्यावर तिच्यावर बंदी येऊ शकते मात्र अ‍ॅप पूर्णपणे बंद करता येत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मॉडेल्स आणि अभिनेत्री केवळ अशाप्रकारच्या चित्रपटांमध्येच काम करतात आणि कुंद्रा यांचा वापर करुन या चित्रपटांची निर्मिती करायचे.

तपासात सहकार्य नाही…

राज कुंद्रांवर एवढे गंभीर आरोप लावण्यात आलेले असतानाही ते तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान कुंद्रा हे सहयोग करत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अनेक प्रश्नांना उत्तर देण्यास कुंद्रा टाळाटाळ करत आहेत. तसेच ते सतत त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळत आहे. मी कोणताही अश्लील चित्रपट बनवलेला नाही असं ते वारंवार सांगत आहेत. मात्र राज कुंद्रांविरोधात गुन्हे शाखेकडे सबळ पुरावे असल्याचं पोलिसांनी अधिक स्पष्ट केलं आहे. कुंद्रा यांना भायखळ्यातील तुरुंगात ठेवण्यात आलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Raj kundra pornography case shilpa shetty home raided by mumbai crime branch scsg