महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. ते सुमारे ४० मिनिटं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर होते. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काही वेळापूर्वीच राज ठाकरे आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे होते. याशिवाय मनसे आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई हेही असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जवळपास ४० मिनिटं होते. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत असल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

खरं तर, राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला होता. गणपतीच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात सुमारे ४५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गट आणि मनसे यांच्यात युतीसंदर्भात यावेळी चर्चा झाली असावी, असे तर्क लावण्यात आले होते.

हेही वाचा- “…तर आम्हाला आवरणं कठीण होईल” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा

त्याचबरोबर दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवावी, याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली होती. यानंतर आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली का? किंवा काय बोलणं झालं? याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.