गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात माहिती उघड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तब्बल २९ वर्षे फरारी असलेल्या राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याचा मतदानाचा हक्क अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या कुर्ला मतदारसंघातील यादीत अन्य तीन भावांसमवेत त्याचे नाव होते, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागातील सूत्रांनी दिली. याबाबत पोलिसांनी कळविल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याचे नाव रद्द केल्याचे कळते. आता त्याचे नाव आढळून येत नाही.
२०१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत टिळकनगर महापालिका शाळा, तमिळ विभाग, खोली क्रमांक चारमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या मतदार यादीत त्याचे नाव ७८८ क्रमांकावर होते. त्याचे भाऊ प्रकाश (७८६), आकाश (७८७) आणि दीपक (७८९) यांच्यासमवेत छोटा राजनचे नाव आहे. त्याच्या नावावर मतदान झाले किंवा नाही हे कळू शकले नाही. मात्र २०१४ पर्यंत मतदार यादीत त्याचे नाव कायम असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कुख्यात गुंड छोटा राजन याचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे, हे माहिती असतानाही मतदार यादी तयार करणाऱ्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे स्पष्ट होते. निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघरी जाऊन मतदार यादीसाठी अर्ज भरून घेतात. या अर्जात जी माहिती दिली जाते तीच माहिती मतदार यादीत येते. त्यामुळे इतर भावांची नावे भरून देताना छोटा राजनचे नावही त्यात टाकण्यात आले असावे आणि कोणीतरी त्याची बनावट सही केली असावी, असे मत निवडणूक मतदार यादीशी संबंधित एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. प्रत्येकवेळी व्यक्ती घरी हजर आहे किंवा नाही, हे पाहिले जात नाही, असेही हा अधिकारी म्हणाला. एखादी व्यक्ती बराच काळपर्यंत मतदान करीत नसल्यास त्याचे नाव कमी केले जाते. परंतु राजन मात्र सुदैवी ठरला आहे.

दोनच ठसे!
छोटा राजनवर तब्बल ७१ गुन्हे दाखल आहेत. परंतु रेड कॉर्नर नोटीससाठी फक्त १४ महत्त्वाचे गुन्हे सोपविण्यात आले होते. १९७८ मध्ये टिळकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा, तर हॉटेल मालक बी. आर. शेट्टी यांच्यावरील गोळीबाराचा शेवटचा गुन्हा २०११ मध्ये नोंदला गेला. छोटा राजनच्या हातांचे फक्त दोनच ठसे अधिकृतपणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे उपलब्ध आहेत. छोटा राजनचा ताबा मिळाला असता तर शेट्टी गोळीबार प्रकरणात त्याचा पोलीस ताबा घेणार होते, अशी माहितीही वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajan has right to vote
First published on: 09-11-2015 at 05:10 IST