२०१४ मध्ये जोधपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे एक न उलगडलेले प्रकरण सोपवले. ४ महिन्यांपूर्वी दिल्लीतून स्वामिनारायण सतवाणी (६२) या व्यापाऱ्याचे अपहरण झाले होते. चार महिने जंग जंग पछाडूनही जोधपूर पोलिसांना त्यांचा शोध घेता आला नव्हता. या व्यापाऱ्याचे अपहरण मुंबईतून झाले आहे, एवढीच माहिती जोधपूर पोलिसांच्या हातात होती. बाकी पुढचा तपास लावण्याचे काम मुंबई पोलिसांवर आले.

सतवाणी हे राजस्थानमधील जोधपूरचे. भंगाराचे साहित्य खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. मे २०१४ पासून ते बेपत्ता झाले आणि त्याच्या पत्नीला अपहरणकर्त्यांचा खंडणीसाठी फोन यायला सुरुवात झाली. हा फोन सतवाणी यांच्याच भ्रमणध्वनीवरून आलेला होता. अपहरणकर्त्यांनी ३० लाख रुपये मागितले होते. सुरुवातीला सतवाणींच्या पत्नीने दुर्लक्ष केले. नंतर प्रकरणाचे गांभीर्य पाहून १९ मे २०१४ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी शेवटचा कॉल हा दिल्लीवरून केलेला होता. सतवाणी यांना दिल्लीत नेले असेल असा कयाल सावून जोधपूर पोलीस दिल्लीत धडकले. पोलिसांनी चार महिने दिल्लीत आणि मुंबईत शोध घेतला. काही हाती लागत नव्हते. हे प्रकरण कधीच सुटणार नाही याची खात्री पटल्यानंतर त्यांनी ते प्रकरण मुंबई पोलिसांकडे सोपवले आणि निघून गेले.

चार महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घ्यायचा होता. हातात काही सुगावा नव्हता. सतवाणी यांच्या कामाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनाही फारशी माहिती नव्हती. ते आपला भ्रमणध्वनीदेखील सतत बदलत असत. त्यामुळे पोलिसांना पूर्वेतिहासही माहीत नव्हता. अशा परिस्थितीत सतवाणी यांचा शोध घ्यायचा होता. चिंतेची बाब म्हणजे तीन महिन्यांपासून अपहरणकर्त्यांचे फोनही यायचे बंद झाले होते. त्यामुळे हे प्रकरण मोठे आव्हान बनलेले होते.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने या प्रकरणाच्या मुळापासून तपासाला सुरुवात केली. तत्कालीन उपायुक्त धनंजय कुलकर्णी, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांच्या पथकाने नव्याने तपास सुरू केला. शीव पोलीस ठाण्यात सतवाणी यांचा मित्र उमेश गोरे याने ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी गोरेकडे चौकशी केली. तो रेल्वेच्या सभागृहांची व्यवस्था पाहायचा. गुरू तेगबहादूर नगर स्थानकाजवळच्या (जीटीबी) रेल्वेच्या सभागृहात सतवाणी काही दिवस थांबले होते. त्याने माहिती दिली की, तीन माणसे आली होती. त्यांनी सतवाणी यांना जबरदस्तीने उचलून नेले.

ज्या वेळी सतवाणी यांना उचलून नेले त्या वेळी सभागृहाचे काम करणारे तीन कर्मचारी होते. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पोलिसांनी त्या तिघांकडे या अज्ञात तरुणांची वर्णने विचारली. चार महिन्यांपूर्वी आलेल्या त्या तिघांचे चेहरे या कर्मचाऱ्यांना आठवत नव्हते. स्मरणशक्तीला ताण देत त्यांनी वर्णन सांगितले. पण काही जुळत नव्हते. पोलिसांनी त्या संशयित इसमांची काही वेगळी खूण आहे का असे विचारले. तेव्हा त्यातील एका इसमाचे केस लांब होते असे त्या तिघांनी सांगितले. पोलिसांनी मग त्या लांब केस असलेल्या व्यक्तींचे रेखाचित्र अंदाजाने बनवून घेतले. लांब केसांचा माणूस, रेखाचित्रही फारसे जुळत नव्हते. पण पोलिसांना लाखोंच्या गर्दीतून लांब केसांचा माणूस शोधायचा होता.

पोलिसांनी अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) लांब केसांचे अनेक आरोपी आणि संशयित उचलून आणले. लांब केसांचे गुन्हेगार कुणी सक्रिय आहेत का त्यासाठी खबऱ्यांचे जाळे विणले. पण हाती काही येत नव्हते. जरी संशयित सापडला आणि त्याने केस कापलेले असतील तरी सगळ्या मेहनतीवर पाणी फिरले गेले असते. सतवाणी हे भंगार व्यवसायाशी निगडित होते. त्यामुळे आरोपी याच व्यवसायातले असावेत असा अंदाज लावला आणि मुंबई आणि परिसरातली सर्व भंगारांचे आगार, लहान-मोठी दुकाने पालथी घालायला सुरुवात केली. अंदाजाने वर्तवलेले रेखाचित्र आणि लांब केस एवढाच काय तो सुगावा होता. अखेर पोलिसांना यश आले. लांब केसांचा माणूस अन्वर सिद्दिकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्वरित वांगणी येथील अन्वरचे घर गाठले. अन्वर पोलिसांच्या हाती लागला नाही. परंतु अन्वरच्या मोबाइल क्रमांकाच्या तपशिलावरून (सीडीआर) पोलिसांना विशाल, आबीद आणि मिथुन या तीन तरुणांची माहिती मिळाली. पोलिसांनी तिघांना एकेक करून ताब्यात घेऊन बोलते केले. तेव्हा त्यांनीच अन्वरच्या मदतीने सतवाणी यांचे अपहरण केल्याची कबुली दिली, परंतु अपहरण करताच मारहाणीत सतवाणी यांचा मृत्यू झाल्याने मृतदेह माळशेज घाटात टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी आदिवासी आणि गिर्यारोहकांच्या मदतीने मृतदेहाचे अवशेष गोळा केले. सतवाणी यांच्या हत्येनंतर त्यांचा फोन दिल्लीत नेऊन खंडणीसाठी फोन करण्यात येत होते. अन्वर सिद्दिकी या अपहरण आणि हत्या प्रकरणातला सूत्रधार होता. या तीनही तरुणांना  या कटात सामील करून घेतले. परंतु सतवाणी यांचा मृत्यू झाल्याने त्यांची योजना फसली होती.

जोधपूर पोलिसांनी न उलगडणारे प्रकरण म्हणून हे काम सोडून दिले होते. परंतु मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केवळ लांब केस या धाग्यावरून या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा केला.

सुहास बिऱ्हाडे

@suhas_news