केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेला आक्षेप आणि उच्च न्यायालयाने वारंवार फटकरल्यानंतर राज्य शासनाने संजय पांडे यांना पोलीस महासंचालकपदावरून दूर करीत रजनीश सेठ यांची पूर्णवेळ महासंचालकपदी शुक्रवारी नियुक्ती केली.

सुबोध जयस्वाल हे केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्यावर हेमंत नगराळे यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. परमबिरसिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावर नगराळे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर  संजय पांडे यांच्याकडे गेल्या एप्रिलपासून पोलीस महासंचालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपिवण्यात आला होता. पूर्णवेळ पोलीस महासंचालकपदी नियुक्तीसाठी राज्य सरकारने हेमंत नगराळे, रजनीश सेठ आणि के. व्यंकटेशम या तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या  नावाची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली होती. नंतर सरकारने संजय पांडे यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. पांडे यांच्या नावाचा प्रस्ताव लोकसेवा आयोगाने फेटाळला होता.

हा घोळ सुरू असतानाच पूर्णवेळ पोलीस महासंचालक असावा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या तिघांपैकी एकाची महासंचालकपदी नियुक्ती करावी म्हणून जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने वारंवार राज्य सरकारला फटकारले होते. संजय पांडे यांना झुकते माप का दिले जात आहे, असा सवालही उच्च न्यायालयाने केला होता. गेल्या आठवडय़ात सरकारने पोलीस महासंचालकपदाच्या नियुक्तीकरिता फेरविचार करण्याचे आश्वासन दिले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत १९८८च्या भारतीय पोलीस सेवेच्या तुकडीतील अधिकारी रजनीश सेठ यांची पूर्णवेळ पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सायंकाळी आदेश जारी करण्यात आला. सेठ हे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून सध्या कार्यरत होते. तीन जणांच्या यादीतील नगराळे आणि व्यकंटेशम हे या वर्षी अनुक्रमे मे आणि ऑक्टोबरमध्ये निवृत्त होत आहे. या तुलतेन सेठ यांना डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत असल्याने त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. नगराळे हे मुंबईचे पोलीस आयुक्त असल्याने महासंचालकपदासाठी त्यांचीही इच्छा नव्हती. संजय पांडे यांना पोलीस महासंचालकपदी कायम ठेवणे शक्य नसल्याने त्यांना बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. १० महिने पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळल्यावर पांडे  यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपद सोपविण्यात आले. पांडे हे येत्या जूनमध्ये सेवानिवृत्त  होत आहेत.