युतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत रणनीती
विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात होणाऱ्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे रामदास कदम यांच्या पाठीशी भाजपची ताकद उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या पसंतीची मते कदमांना द्यायची, परंतु दुसऱ्या पसंतीची मते कुणालाही द्यायची नाहीत, अशी रणनीती शनिवारी युतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत ठरविण्यात आली.
शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी सरळ वाटणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बंडखोराची उमेदवारी, भाजपच्या उमेदवाराची माघार आणि मनसेने तटस्थ राहण्याची घेतलेली भूमिका, यामुळे वेगळेच रंग भरले आहेत. युती सरकारमध्ये मंत्री असलेले रामदास कदम यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८८ नगरसेवक आहेत. त्यामुळे कदम यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
काँग्रेसनेही विद्यमान आमदार भाई जगताप यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ५१ नगरसेवक आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे १४, समाजवादी पक्षाचे ८ व ५ अपक्षांचा पाठिंबा काँग्रेसने गृहीत धरला आहे. सुरुवातीला शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशा सरळ वाटणाऱ्या लढतीला राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्या उमेदवारीने वेगळेच वळण लागले. दुसऱ्या बाजूला ३१ नगरसेवक असलेल्या भाजपनेही मनोज कोटक यांना मैदानात उतरविले होते. त्यांचा डोळा मनसेच्या २८ नगरसेवकांच्या मतांवर होता, परंतु मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाजपच्या उमेदवाराने लगेच माघार घेतली. राष्ट्रवादीचे लाड मात्र रिंगणात कायम आहेत.
२७ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शनिवारी सेना-भाजपच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक घेण्यात आली.
भाजपची पहिल्या पसंतीची मते कदम यांना दिली जातील, असे शेलार यांनी जाहीर केले. मात्र दुसऱ्या पसंतीची मते कुणालाही दिली जाणार नाहीत, अशी भाजपने रणनीती ठरविली आहे. त्यामुळे या निवडणुकीत खरी कसोटी काँग्रेसचे भाई जगताप यांची लागणार आहे.