केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सडकून टीका केलीय. “लग्न आमच्या ठरलं होतं, हे पळून गेले आणि दुसऱ्याची लग्न लावलं. आता आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू,” असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतःसाठी अच्छे दिन आणले, पण राज्यातील १२ कोटी लोकांना बुरे दिन आल्याचाही टोला लगावला.

रावसाहेब दानवे म्हणाले, “लग्न आमच्या ठरलं होतं, हे पळून गेले आणि दुसऱ्याची लग्न लावलं. ज्यांनी मतं दिली त्यांनी भाजपा-शिवसेनेला मतदान केलं. ज्याला मतं दिलं त्याच्यासोबतची युती तोडून टाकली. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी युती तोडली. यांच्या एका मुख्यमंत्रीपदासाठी सर्व आमदार-खासदार नाराज आहेत. त्यामुळे जनता निर्णय करेल. हे काय कोथळा काढतात, निवडणुकीत आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू.”

“स्वतःला अच्छे दिन, पण राज्यातील १२ कोटी लोकांना बुरे दिन”

“बाकीच्यांना सोडा पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अच्छे दिन आलेत. मतदारांनी भाजपा-शिवसेनेला मतदान केलं आणि आपल्याशिवाय सरकार स्थापन होत नाही हे शिवसेनेला लक्षात आलं तेव्हा त्यांनी धोका दिला. असंगाशी संगत केली. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. स्वतःला अच्छे दिन आले, पण या राज्यातील १२ कोटी लोकांना त्यांनी बुरे दिन आणले,” असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला.